मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेतील गैरप्रकारांवर आभासी प्रणालीव्दारे लक्ष

यंदाच्या परीक्षेत ६७ शिक्षणक्रमातील ७७ हजार ७८९ विद्यार्थी आणि दोन लाख ६१ हजार २९९ उत्तरपत्रिका असणार आहेत.

गतवेळच्या ३९० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

नाशिक: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांची ६७ शिक्षणक्रमांच्या हिवाळी परीक्षा आभासी प्रणालीव्दारे देखरेख पध्दतीने ८ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. त्याची नोंद व्यवस्थेत घेतली जाईल. विद्यार्थ्यांने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्याला प्रमाद समितीला सामोरे जावे लागणार आहे. मागील परीक्षेत याच कारणास्तव ३९० विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत

यंदाच्या परीक्षेत ६७ शिक्षणक्रमातील ७७ हजार ७८९ विद्यार्थी आणि दोन लाख ६१ हजार २९९ उत्तरपत्रिका असणार आहेत. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत पाच तासांच्या कालमर्यादेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपलब्धतेनुसार ही परीक्षा द्यावयाची आहे. ज्यांची प्रवेश पात्रता कायम केलेली आहे तसेच ज्यांना कायम नोंदणी क्रमांक प्राप्त झाला आहे, त्यांचीच परीक्षा होणार आहे.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

हंगामी पात्रता झालेल्यांना परीक्षा देता येईल, मात्र त्यांचे निकाल जाहीर होणार नाही, हंगामी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यास केंद्रांशी संपर्क करून पात्रतेची कागदपत्रे विद्यापीठाच्या नोंदणी अ‍ॅट वायसीएमओयू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एसी या मेलवर पाठवून आपला प्रवेश तात्काळ कायम करून घेता येईल. विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रांवर प्रत्येकी चार तांत्रिक सहायकांची विद्यार्थ्यांना तांत्रिक साहाय्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी कुठलेही गैरप्रकार न करता, भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि परीक्षा नियंत्रक भटुप्रसाद पाटील यांनी केले आहे.

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक

पाच वेळा इशारा देऊनही गैरप्रकार

२१ डिसेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत झालेल्या परीक्षेतदेखील प्रॉक्टर पध्दतीचा वापर करण्यात आला होता. या परीक्षेत एकूण ४१८०३ परीक्षार्थी आणि एक लाख १६ हजार ५५५ इतक्या उत्तरपुस्तिका होत्या. त्यात संगणकीय आज्ञावलीद्वारे प्रॉक्टर पध्दतीतून ३९० विद्यार्थ्यांनी पाचपेक्षा अधिक वेळा इशारा देऊनदेखीलही गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधिताचा निकाल निकाल राखीव ठेवण्यात आला असून परीक्षा गैरप्रकार समितीसमोर ही प्रकरणे ठेवली जातील. चौकशी समितीच्या निर्णयानंतर संबंधितांच्या निकालावर कार्यवाही करण्यात येणार आहे.