मुक्त विद्यापीठाच्या ‘पीएच.डी.’धारकांना डावलले

पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेवर अनेक सहयोगी प्राध्यापकांनी शंका उपस्थित केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेतील प्रकार

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी ‘कॅस’ अंतर्गत पार पडलेल्या प्रक्रियेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या अनेकांना डावलण्यात आले आहे. सुरुवातीला मुक्त विद्यापीठाची पीएच.डी. ग्राह्य धरत नसल्याचे सांगून मुलाखतीत अनुत्तीर्ण करण्यात आले. नंतर मात्र काहींची तीच पीएच.डी. ग्राह्य धरली गेली. एकाच प्रक्रियेत परस्परविरोधी निकषांमुळे सहयोगी प्राध्यापकांमध्ये अन्यायाची भावना आहे.

दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार उपरोक्त प्रक्रिया पार पडली. ज्यांची पीएच.डी. ग्राह््य धरली, ती प्रकरणे शासन मान्यतेसाठी पाठविली जाणार असल्याचे पुणे विद्यापीठाने म्हटले आहे. पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदासाठी पार पडलेल्या मुलाखत प्रक्रियेवर अनेक सहयोगी प्राध्यापकांनी शंका उपस्थित केली. यात प्राध्यापकांचे संशोधनातील योगदान, विद्यापीठ-महाविद्यालयीन कामकाज, अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमातील सहभाग तसेच विषय ज्ञान, सादरीकरणाची पद्धत आदी निकषांवर गुणांचे वर्गीकरण केले जाते.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नाशिकमध्ये तयारी

विहित निकषांपेक्षा उजवी कामगिरी करणाऱ्यांना मुलाखतीत डावलले गेल्याची तक्रार नाशिकच्या सहयोगी महिला प्राध्यापिकेने केली. १८ संशोधन निबंध, ज्यातील सात हे यूजीसीच्या यादीतील पत्रिकेत प्रसिद्ध झाले, संशोधन कार्याचे अनेक देशांत, राष्ट्रीय परिषदेत सादरीकरण, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांना मार्गदर्शन याकडे समितीने दुर्लक्ष केले. कचरा डेपोमुळे परिसरात होणाऱ्या प्रदूषणाबाबतच्या संशोधन कार्याची दखल नाशिक महापालिकेला घ्यावी लागली. प्लास्टिक बंदीनंतर वापरल्या जाणाऱ्या कापडीसारख्या पिशव्यांमध्ये प्लास्टिकचे अंश असल्याची बाब प्रयोगांती सिद्ध केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची दखल घेतली. मुलाखत प्र्रक्रिया उत्तम पार पडूनही मुक्त विद्यापीठाची पीएच.डी. ग्राह््य धरता येणार नसल्याचे सांगून कमी गुण दिल्याची तक्रार होत आहे. लॅपटॉपमध्ये बिघाड असल्याचे सांगून समितीने सादरीकरणाची संधी दिली नाही. या प्र्रक्रियेत व्यक्तिनिहाय वेगवेगळे निकष लावले गेल्याचा आक्षेप मनमाड महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. संभाजी खैरनार यांनी नोंदविला.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

दावा काय? : जे सरळ मार्गाने मुलाखतीला सामोरे गेले, त्यांना मुक्त विद्यापीठाच्या पीएच.डी.चे कारण देऊन बढती नाकारली. हा निकष नंतर समितीने बदलून काही सहयोगी प्राध्यापकांना बढती दिल्याची तक्रार डॉ. खैरनार यांनी विद्यापीठाकडे केली आहे. मुलाखतीत अनुत्तीर्ण झालेल्यांना वर्षभराने पुन्हा या प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम अन्य विद्यापीठांना समकक्ष असल्याचा निर्वाळा दिल्याचा संबंधित प्राध्यापकांचा दावा आहे.

‘कॅस’ची प्रक्रिया उच्च शिक्षण विभागाच्या आधिपत्याखाली नियमानुसार पार पडते. पुणे विद्यापीठाने तिचे केवळ व्यवस्थापन केले. या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पण, त्यामध्ये तथ्य नाही हे सहयोगी प्राध्यापकांनाही माहिती आहे. मुक्त विद्यापीठाची पदवी कला, वाणिज्यसारख्या विषयात ग्राह्य धरली जाते. परंतु, व्यावसायिक, विज्ञानाच्या अभ्यासक्रमात ग्राह्य धरली जात नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाचे तसे निकष आहेत. या प्रक्रियेत काहींची पीएच.डी. ‘शासन मान्यतेच्या अधीन राहून’ असा शेरा मारून ग्राह्य धरण्यात आली. कामगिरीअभावी काही जण मुलाखतीत अनुत्तीर्ण झाले. यात विषय तज्ज्ञांचा निर्णय अंतिम असतो. त्यानुसार ही प्रक्रिया पार पडली. –  नितीन कळमकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला