शहरात करोनाबाधितांची संख्या दीड हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे
थेट करोना चाचणीसाठी रवानगी
नाशिक : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या पाठोपाठ खुद्द पोलीस आयुक्त देखील रस्त्यावर उतरल्यानंतर संबंधितांच्या हाताखालील यंत्रणाही कार्यप्रवण झाल्या आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांची धरपकड सुरू झाली आहे. संबंधितांची थेट चाचणी आणि अहवाल सकारात्मक आल्यास रुग्णालयात दाखल करण्याचे फर्मान निघाल्याने नियमभंग करणाऱ्यांना चाप लावण्यास हातभार लागणार आहे.
शहरात करोनाबाधितांची संख्या दीड हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. अंशत: टाळेबंदी आणि करोना नियमावलीच्या कठोर अंमलबजावणीद्वारे प्रादुर्भाव नियंत्रित करण्याचे प्रयत्न होत आहेत. मध्यंतरी पालक सचिवांसमवेत झालेल्या बैठकीनंतर सर्व यंत्रणा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याकडे लक्ष देत आहेत. मुखपट्टी नसणारे, थुंकीबहाद्दर यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, दंड करूनही फारसा परिणाम होत नसल्याने कारवाईचे स्वरूप बदलण्यात आले. पालिका-पोलिसांनी मुखपट्टी नसणाऱ्यांना पकडून थेट चाचणीसाठी नेण्याचे निश्चित केले. संबंधितांची चाचणी केली जाईल. अहवाल सकारात्मक आल्यास त्यांना उपचारार्थ दाखल केले जाणार आहे. सुरक्षित अंतर न पाळणे, गर्दी करणे वा तत्सम नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त दीपक पाण्डये यांनी दिला आहे.
बुधवारी मुखपट्टी नसणाऱ्या ३५० जणांना पकडण्यात आले. पंचवटी, नाशिकरोड, गंगापूर, अंबड आणि नाशिकरोड पोलिसांनी १४४ जणांची चाचणीसाठी रवानगी के ली. यात दोन करोनाबाधित आढळले. गुरूवारी या कारवाईने अधिक वेग घेतला. सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईचा दैनंदिन अहवाल देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी मुखपट्टीविना फिरणाऱ्यांची धरपकड सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
भद्रकाली, दूध बाजाराकडे लक्ष
सायंकाळी सातनंतर जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने बंद होतील, यावर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मागील काही दिवसात मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने सायंकाळी बंद होतात. परंतु, भद्रकाली, दूध बाजार भागात व्यापारी नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत आहे. या परिसरात ना दुकाने बंद होतात, ना गर्दी कमी झालेली दिसते. नियमावलीची सर्वत्र अमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये हे परिसरात भेट देणार आहेत. बुधवारी आयुक्तांनी रविवार कारंजा, मेनरोडला भेट दिली होती. त्याच धर्तीवर गुरूवारी सायंकाळी ते भद्रकाली, दूध बाजारातील स्थितीचा आढावा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.