मृत्युदर कमी राखण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी

करोना साथरोगाशी संपूर्ण जग आज लढा देत आहे. या काळात जिल्ह्य़ातील मृत्युदर हा राज्याच्या तुलनेत सर्वात कमी राहिला.

छगन भुजबळ यांचा दावा

नाशिक : करोना साथरोगाशी संपूर्ण जग आज लढा देत आहे. या काळात जिल्ह्य़ातील मृत्युदर हा राज्याच्या तुलनेत सर्वात कमी राहिला. याचे सर्व श्रेय जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेचे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मुलतानपुरा येथील मनपा संचालित सैयदानी माँजी साहेब प्रसूतिगृह, मौलानाबाबा व्यायामशाळा यांचे उद्घाटन आणि परिसरातील रस्ते कामाचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

शासकीय आरोग्य यंत्रणा प्राणवायूच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वानी आरोग्यभान राखून मुखपट्टी, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सर्वसोयीयुक्त सुसज्ज प्रसूतिगृह, अत्याधुनिक आणि दर्जेदार साधनांनी परिपूर्ण व्यायामशाळेचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून साध्य होत असल्याचे नमूद केले. या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. पहिल्या दोन लाटांचा अनुभव गाठीशी असल्याने करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासनाकडून गांभीर्यपूर्वक पावले उचलण्यात येत असून कोणत्या गोष्टींची अधिक गरज आहे, त्यानुसार भर देण्यात येत आहे. तिसरी लाट आली तरी सर्व काही नियंत्रणात राहील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नगरसेविका सुफियान जीन, रंजन ठाकरे, नगरसेविका वत्सला खैरे आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

‘बिटको’तील बालक कक्षाची पाहणी

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात बालकांवरील उपचारासाठी नव्या कक्षाची उभारणी करण्यात आली. त्याची पाहणी पालकमंत्री भुजबळ यांनी केली. यावेळी आ. सरोज अहिरे, पालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, कक्षप्रमुख डॉ. कल्पना कुटे, डॉ. आवेश पलोड उपस्थित होते. बालकांसाठीच्या कक्षाची रचना, चित्रांची रंगसंगती उत्तम आहे. या कक्षात १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. व्हेंटिलेटरयुक्त असा हा कक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सिटी स्कॅन यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले