‘मेटा’च्या ‘थ्रेड्स’वर लाखोंच्या उडय़ा! ‘ट्विटर’शी स्पर्धा; पहिल्याच दिवशी दोन कोटींहून अधिक सभासद

प्रथमदर्शनी ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यात एका पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा असणार आहे.

लंडन : शब्दसंवादावर भर देणारे चर्चापीठ म्हणून लोकप्रिय असलेल्या ‘ट्विटर’ या समाजमाध्यमाशी थेट स्पर्धा करणारे ‘थ्रेड्स’ हे नवीन समाजमाध्यम फेसबुक, इन्स्टाग्रामची मालक कंपनी असलेल्या ‘मेटा’ने गुरुवारपासून कार्यान्वित केले. इलॉन मस्क यांच्याकडे मालकी गेल्यापासून ट्विटरवर वारंवार होत असलेल्या बदलांना त्रासलेल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा ‘थ्रेड्स’चा प्रयत्न असून पहिल्या दिवशी अवघ्या १२ तासांत सव्वा दोन कोटी जणांनी या अ‍ॅपवर नोंदणी केली.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

प्रथमदर्शनी ट्विटरसारखीच मांडणी असलेल्या ‘थ्रेड्स’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्यात एका पोस्टसाठी ५०० शब्दांची मर्यादा असणार आहे. ही शब्दमर्यादा ट्विटरवरील मर्यादेच्या जवळपास दुप्पट आहे. त्यासोबतच एका पोस्टमध्ये संकेतस्थळांच्या ‘लिंक’, छायाचित्रे आणि पाच मिनिटांपर्यंतच्या चित्रफिती जोडण्याची मुभा वापरकर्त्यांला असेल. या वैशिष्टय़ांमुळे ‘थ्रेड्स’ ट्विटरसमोर थेट आव्हान उभे करेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून केलेली कामगार कपात, त्यावरील ओळख पडताळणीसाठीची मासिक शुल्क आकारणी तसेच पोस्टच्या संख्येवरील मर्यादा अशा निर्णयांमुळे ट्विटरची लोकप्रियता घटत चालली आहे.  जाहिरातदारांनीही त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. या परिस्थितीचा ‘थ्रेड्स’ला फायदा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे