मोठी बातमी! सिक्कीममध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; १६ भारतीय जवानांचा मृत्यू

उत्तर सिक्कीममधील झेमा येथे ही दुर्घटना घडली आहे.

सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत चार जवान जखमी झाले आहे. घटनास्थळावर स्थानिक पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन चट्टेनहून थांगूच्या दिशेने निघाले होते. झेमा येथे वळणावर मोठा उतारा होता. तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जवानांची बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत १६ जवानांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलीसांकडून तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. दरीत कोसळलेल्या ४ जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेत तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ जवानांचा मृत्यू झाला आहे, असं भारतीय लष्कराकडून निवेदन जारी करत सांगितलं आहे.

या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. “उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या रस्ते अपघातात लष्कराच्या निधनामुळे दु:ख झालं आहे. त्यांच्या सेवेबद्दल आणि वचनबद्धतेबद्दल देश मनापासून कृतज्ञ आहे. शोकग्रस्त कुटुंबीयाप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी जवान लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो,” असं राजनाथ सिंह म्हणाले.

हे वाचले का?  Lal Krishna Advani : लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?