पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन पूजा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन पूजा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर परिसराच्या सुशोभिकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विशेष बाब म्हणून काळाराम मंदिर परिसर सुशोभिकरण आणि ओसरीच्या नुतनीकरणासाठी सुमारे दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
काळाराम मंदिर हे पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणूनच ओळखले जाते. नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. काळाराम मंदिराचे नूतनीकरण व परिसरातील नूतनीकरणासाठी एक कोटी ८२ लाख रुपये निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात आला. जिल्हा नियोजन समितीने या निधीस मंजूरी दिली. येणाऱ्या काळात काळाराम मंदिराच्या परिसरात सोयी सुविधा आणि परिसरातील सुशोभीकरण होणार आहे. भविष्यात अजून जी जी विकास कामे करता येतील ते करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. काळाराम मंदिर परिसराचे युध्दपातळीवर सुशोभिकरण केले जात आहे. काही वर्षापासून पावसाळ्यात मंदिरात पावसाचे पाणी झिरपत आहे. त्यामुळे काही ठिकाणी बांधकामावर पांढरा थर साचतो. मंदिराच्या बांधकामासाठी ही गंभीर बाब असल्याने त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंदिराच्या ओसरीचे नुतनीकरण व सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.