रतन टाटा यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन आपली पहिली प्रतिक्रियाही दिली आहे.
भारतीय हवाईदलाची मालवाहतूक विमाने टाटा समूह आणि युरोपची एअरबस कंपनी यांच्याकडून संयुक्तरीत्या बनवून घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने दोन आठवड्यांपूर्वीच मंजूरी दिली. त्यानंतर आज संरक्षण दलाच्या माध्यमातून सरकारने या दोन्ही कंपन्यांसोबत २० हजार कोटी रुपयांचा करार निश्चित करुन त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याचसंदर्भात आता टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवरुन टाटांनी या संदर्भात भाष्य करताना टाटा समुहातील उपकंपनी असणाऱ्या टाटा अॅडव्हान्स सिस्टीमबरोबरच भारतीय संरक्षण दल आणि एअरबसचंही अभिनंदन केलं आहे.
एअरबस डिफेन्स आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टीम सी २९५ विमानांची बांधणी करणार असून यासाठी मिळालेल्या मंजूरीमुळे भारतामध्ये हवाई क्षेत्रामधील नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. ही संमती म्हणजे या क्षेत्रात नव्याने संधी उपलब्ध करुन देण्यासाठी उचलण्यात आलेलं मोठं पाऊल असल्याचं टाटा म्हणाले आहेत.
सी २९५ हे मल्टीरोल म्हणजेच एकाचवेळी अनेक कामं करु शकणारं विमान असून यामध्ये आवश्यकतेनुसार बरेच बदल करण्यात आल्याचंही टाटा म्हणाले आहेत. हे विमान पूर्णपणे भारतामध्येच तयार होणार आहे. तसेच या माध्यमातून घरगुती मागणी आणि पुरवठासंदर्भातील साखळीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा मिळणार आहे. यापूर्वी असा प्रकल्प कधी हाती घेण्यात आला नव्हता, असंही टाटांनी या शुभेच्छा देताना अधोरेखित केलं आहे. या निर्णयाच्या माध्यमातून मेक इन इंडियाला चालना मिळेल असंही रतन टाटा म्हणाले आहेत.
सैन्यदलांसाठी विमाने विकसित करणे – तंत्रज्ञान हस्तांतराच्या मार्गाने आणि स्वदेशी तंत्रज्ञान वापरून – ही जबाबदारी आजवर हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या कंपनीवरच असे. लष्करी क्षेत्रातील सार्वजनिक उद्योेगांची मक्तेदारी संपुष्टात आणायचे विद्यमान सरकारचेच धोरण आहे. त्यास राजकीय विरोध होणे स्वाभाविक असले, तरी कोणत्याही प्रकारच्या मक्तेदारीला अर्थशास्त्रीय शहाणपणात स्थान नाही. उलट स्पर्धेतून दर्जा आणि उत्पादकताच वाढते. भारतातील अनेक खासगी कंपन्यांनी – उदा. टाटा, महिंद्रा, एल अँड टी – अवजड लष्करी सामग्री निर्मितीच्या क्षेत्रात रस दाखवला आहे. या सामग्रीसाठी परदेशी कंपन्यांवर आणि त्या देशांतील सरकारांच्या मर्जीवर विसंबून राहणे कमी व्हावे, यासाठी खासगी क्षेत्रामार्फत देशांतर्गतच अशी निर्मिती करणे हा एक मार्ग. अशा प्रकारे हवाईदलासाठी एखादे विमान भारतातच विकसित होण्याची ही पहिलीच वेळ असेल. टाटा कंपनीने यापूर्वी अमेरिकी बोईंग कंपनीच्या साह्याने अपाचे या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी ‘सांगाडा’ (फ्युसलाज) विकसित केला होता. यावेळची भागीदारी बोईंगची प्रतिस्पर्धी असलेल्या एअरबस कंपनीबरोबर असेल. भारतीय हवाईदलामध्ये अनेक विभागांतील विमाने जुनाट आणि आयुर्मान ओलांडलेली आहेत.