डॉक्टरांची उपलब्धता असणाऱ्या खासगी रुग्णालयातही म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
जालना : करोना झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येणाऱ्या म्युकरमायकोसिस या विकारावर उपचार करण्यासाठी राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष आणि उपचाराची यंत्रणा उभी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.
टोपे म्हणाले, म्युकरमायकोसिस विकारावरील उपचारासाठी कान-नाक-घसा, नेत्ररोग, मेंदूविकार, प्लॅस्टिक सर्जरी इत्यादी पाच-सहा तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात असे कक्ष उभारण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत राज्यात जवळपास एक हजार रुग्णालये आहेत. परंतु या सर्वच रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस उपचारासाठी आवश्यक असणारे पाच-सहा तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे अशा डॉक्टरांची उपलब्धता असणाऱ्या खासगी रुग्णालयातही म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत.
म्युकरमायकोसिस उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनच्या १ लाख ३८ हजार कुप्यांची मागणी अलीकडेच राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्राकडे केली आहे. ही इंजेक्शन्स महागडी असू एका रुग्णांस १४ लागतात. उपमुख्यमंत्र्यांनी अलीकडेच म्युकरमायकोसिस उपचाराची औषधी व इंजेक्शन्स जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणण्याचे सूचित केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना राजेश टोपे म्हणाले, म्युकरमायकोसिस विकारावरील एक लाख इंजेक्शन्स खरेदीची प्रक्रिया राज्य सरकारने हाफकीन संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आहे. शनिवारी पाच हजार इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत. या इंजेक्शन्सचा कोटा महाराष्ट्रास वाढून मिळावा तसेच त्यावरील किंमत कमी करावी, अशी विनंती आपण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सहा राज्यांशी संवाद साधला त्यावेळी केली आहे. अॅम्फोथ्रीसीन बी हे इंजेक्शन आवश्यकतेएवढे उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. एकूण चाचण्यांमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण अधिक असणाऱ्या महाराष्ट्रामधील सतरा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी येत्या २० मे रोजी पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.
रक्तचाचण्यांचे निर्देश
करोना काळजी केंद्र (सीसीसी) आणि करोना समर्पित आरोग्य केंद्रात (डीसीएचसी) रक्ताच्या आवश्यक चाचण्या करण्याची सूचना करण्यात आली आहे. सीबीसी आणि सीआरपी या रक्तचाचण्या महत्त्वाच्या आहेत. फ्रेरिटीन, आयएलसिक्स, डीडायमर या चाचण्या करोना समर्पित आरोग्य केंद्रात केल्या पाहिजेत. करोना काळजी केंद्रांमध्ये लक्षणे नसणारे रुग्ण असतात. परंतु तेथे किमान सीबीसी आणि सीआरपी रक्तचाचण्या करण्याचे निर्देश संबंधित आरोग्य यंत्रणेस देण्यात आले आहेत. – राजेश टोपे, आरोग्यमंत्री