“…म्हणून पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगावं”

नाशिक, पुणे, महाडमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी सर्वात आधी नाशिकमध्ये शिवसेनेचे नाशिकमधील शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत राणे यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. या एफआयआरच्या आधारे नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकबरोबरच पुणे आणि महाडमध्येही राणेंविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणामध्ये राणेंविरोधात सर्वात प्रथम तक्रार दाखल करणाऱ्या बडगुजर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना राणेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

आंदोलनाचा इशारा

राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य हे असंसदीय पद्धतीचं असल्याचं बडगुजर म्हणाले आहेत. तसेच राणेंनी खाल्ल्या मिठाला जागणं गरजेचं आहे, असा टोलाही त्यांनी लागवला आहे. सध्या पोलिसांचं एक पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाल्याने पोलीस करत असलेल्या कारवाईवर आपण समाधानी असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर शिवसैनिक चळवळ उभी करतील असंही बडगुजर म्हणाले आहेत. तसेच कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली असून भविष्यात या प्रकरणात कशाप्रकारे कारवाई होते हे पाहून शिवसैनिक रस्त्यावर उतरणार की नाही हे ठरेल असे संकेतही बडगुजर यांनी दिलेत.

हे वाचले का?  नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

मोदींनी राणेंचा राजीनामा घ्यावा

उद्धव ठाकरेंबद्दल नारायण राणे अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देत आहेत, असा आरोपही बडगुजर यांनी केलीय. राणे अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला पाहिजे, असंही बडगुजर म्हणाले आहेत. राणेंना केंद्रीय मंत्रिपदाच्या रुपाने चांगलं काम करुन राजकीय भविष्य सुधारण्याची संधी मिळालेली. मात्र राणेंनी ती संधी वाया घालवल्याचं दिसत आहे. केंद्रीय मंत्र्याला शपथ देताना कोणत्याही राज्याविषयी, नेत्याविषयी आकस बाळगणार नाही, अशी शपथ दिली जाते. राणेंनी याचं उल्लंघन केलं आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा, अशी मागणी बडगुजर यांनी केलीय.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

नारायण राणेंचं नेमकं काय म्हणाले?

नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.

“महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला किती चीड येणारी गोष्ट आहे. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, ड्रायव्हरच नाही. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.

हे वाचले का?  नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव