युवा नेमबाजांचा सुवर्णवेध!

सौरभ-मनू, दिव्यांश-एलाव्हेनिल यांची सुवर्णपदकांची कमाई

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

सौरभ चौधरी आणि मनू भाकर तसेच दिव्यांश सिंह पनवार आणि एलाव्हेनिल वालारिवान या भारताच्या युवा जोड्यांनी नवी दिल्लीत सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी निर्विवाद वर्चस्व गाजवले. या नेमबाजांनी १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला.

सौरभ-मनू यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला मिश्र सांघिक सुवर्णपदक मिळवून देत पदकतालिकेत भारताचे अग्रस्थान अधिक भक्कम केले. सौरभ-मनू या भारताच्या युवा जोडीने इराणच्या गोलनोश सेबाटोलाही आणि जावेद फोरौघी यांच्यावर १६-१२ अशी मात केली. विशेष म्हणजे ०-४ अशा पिछाडीनंतरही जोमाने पुनरागमन करत भारताच्या जोडीने सुवर्णयश मिळवले. भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक ठरले. त्याचबरोबर विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील सौरभ-मनूचे हे मिश्र सांघिक प्रकारातील पाचवे सुवर्णपदक ठरले. याच गटात यशस्विनी सिंह देस्वाल आणि अभिषेक वर्मा या युवा जोडीने तुर्कीच्या सेवाल इलायडा तरहान आणि इस्माइल केलेस यांच्यावर १७-१३ असा विजय मिळवत कांस्यपदक पटकावले.

हे वाचले का?  Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा

त्याआधी दिव्यांश-एलाव्हेनिल यांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले होते. एलाव्हेनिलचे हे विश्वचषकातील पहिले तर दिव्यांशचे चौथे सुवर्णपदक ठरले. यंदाच्या स्पर्धेतील दिव्यांशचे हे दुसरे पदक ठरले. वैयक्तिक गटात त्याने कांस्यपदक मिळवले होते. भारतीय जोडीने सुवर्णपदकाच्या या सामन्यात १६ गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या हंगेरीच्या इस्तवान पेनी आणि इस्तझेर डेनेस यांना १० गुणच मिळवता आले.

हे वाचले का?  Maharashtra News Live: ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेच्या वडिलांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “त्याला पाच कोटी आणि…”

‘‘या स्पर्धेत सहभागी होता आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. दिव्यांशच्या साथीने चांगली कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्याने हा आनंद द्विगुणित झाला,’’ असे इलाव्हेनिल हिने सांगितले. पात्रता फेरीत इलाव्हेनिलने २११.२ आणि दिव्यांशने २१०.१ असे मिळून ४२१.३ गुण मिळवले होते. पेनी-डेनेस जोडीला ४१९.२ गुण मिळवता आले होते. याच गटात भारताच्या अंजूम मुदगिल आणि अर्जुन बबुटा यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

स्किट प्रकारात पुरुषांना सुवर्ण, महिलांना रौप्य

भारतीय पुरुष संघाने स्किट प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली तर महिलांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गुरजोत खांगुरा, मायराज अहमद खान आणि वीर सिंह बाजवा यांच्या भारतीय संघाने कतारच्या नासीर अल-अत्तिया, अली अहमद अल-इशाक आणि राशीद हमाद यांच्यावर ६-२ असा विजय मिळवला. परिणाझ धालिवाल, कार्तिकी सिंह शख्तावत आणि गनेमत सेखॉन यांच्या महिला संघाला अंतिम फेरीत कझाकस्तानच्या रिनाटा नासीरोव्हा, ओल्गा पानरिना आणि झोया क्रावचेंको यांच्याकडून ४-६ अशी हार पत्करावी लागली.

हे वाचले का?  Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा आज पुन्हा उतरणार मैदानात, डायमंड लीग स्पर्धा लाईव्ह कुठे, कधी आणि किती वाजता पाहता येणार?