रणजितसिंह मोहिते यांच्यावर कारवाईऐवजी अभिनंदनाचे पत्र, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्राने चर्चा

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई होण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांना अभिनंदनाचे पत्र आले आहे.
सोलापूर : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर कारवाई होण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांना अभिनंदनाचे पत्र आले आहे. पक्षाचे एक हजार सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल आमदार मोहिते-पाटील यांचे बावनकुळे यांनी हे अभिनंदन केले असून हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हे वाचले का?  Guillain-Barré Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील गटाने शरद पवार गटाचा प्रचार करत भाजपचा पराभव केला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याच्या आरोपावरून भाजपच्या प्रदेश कार्यालयातून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

यात सात दिवसांत समाधानकारक खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र नोटीस बजावून महिना उलटला तरी अद्यापि पक्षाकडून आमदार मोहिते-पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दुसरीकडे ही कारवाई लवकरच होणार असल्याचे सांगितले जात असतानाच बावनकुळे यांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवले आहे. भाजप संघटनपर्वामध्ये आपण एक हजार सदस्यांची नोंदणी केल्याबद्दल बावनकुळे यांनी आमदार मोहिते-पाटील यांचे या पत्रातून अभिनंदन केले आहे.