रशियाच्या ‘न्याय्य युद्धाला’ उत्तर कोरियाचा पाठिंबा; पुतिन यांच्या भेटीनंतर किम यांची भूमिका; शस्त्रास्त्र करारावर चर्चेची पुष्टी नाही

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह प्रक्षेपण तळांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रशियाच्या ‘न्याय्य युद्धा’ला संपूर्ण आणि विनाअट पाठिंबा असल्याचे सांगितले.

एपी, सेऊल : उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह प्रक्षेपण तळांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रशियाच्या ‘न्याय्य युद्धा’ला संपूर्ण आणि विनाअट पाठिंबा असल्याचे सांगितले. ‘साम्राज्यवाद्यांविरोधातील’ आघाडीवर आपण नेहमीच रशियाच्या बरोबर असू असा दावा त्यांनी केला. या पाहणीनंतर झालेल्या बैठकीमध्ये लष्करी सहकार्याविषयी चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र त्याविषयी स्पष्ट काही सांगण्यात आले नाही.

हे वाचले का?  मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित

रशियातील अगदी पूर्वेला असलेल्या व्होस्टोकनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण तळाच्या प्रवेशद्वारावर पुतिन यांनी किम यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना पुतिन यांनी दोन्ही देशांदरम्यान आर्थिक सहकार्य, मानवतावादी मुद्दे आणि प्रादेशिक परिस्थिती यावर चर्चा होईल असे जाहीर केले. त्यानंतर किम यांनी युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा व्यक्त केला. रशिया आपले सार्वभौमत्वाचे अधिकार, सुरक्षा आणि हितसंबंध यांचे संरक्षण करण्यासाठी वर्चस्ववादी शक्तींविरोधात हे युद्ध लढत असल्याचे ते म्हणाले.

प्रक्षेपण तळांची पाहणी केल्यानंतर उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यादरम्यान बुधवारी चार ते पाच तास द्विपक्षीय चर्चा झाली अशी माहिती रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयए नोव्हेस्तीने दिली. आधी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत आणि नंतर केवळ दोन नेत्यांदरम्यान चर्चा झाली. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. ‘दोन्ही देशांदरम्यान संवेदनशील विषयांवर चर्चा झाली, ती सार्वजनिक करता येणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

चर्चेनंतर किम हे कोम्सोमोल्स्क-ऑन-आमुर आणि व्लादिवोस्तोक या दोन शहरांना भेट देणार असल्याचे पुतिन यांनी सांगितले. दुसरीकडे, किम रशियाच्या मार्गावर असतानाच उत्तर कोरियाने दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करून आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. किम देशात उपस्थित नसताना उत्तर कोरियाने प्रथमच क्षेपणास्त्र चाचणी घेतली आहे.