जगात लोखंडी सळ्यां उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठय़ाची साखळी अधिक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे लोखंडी सळ्यांच्या भावात वाढ झाली आहे.
जालना : रशिया आणि युक्रेनमधील संघर्षांमुळे भारतातील बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळय़ांच्या भावात वाढ झाली आहे. लोखंडी सळय़ा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना येथील या उत्पदनाचे भाव मागील आठ-दहा दिवसांत प्रतिटनामागे चार हजार रुपयांनी वाढले आहेत.
कालिका स्टीलचे संचालक आणि जालना स्टील मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम गोयल यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले,की आठ-दहा दिवसांपूर्वी लोखंडी सळय़ांचा भाव प्रतिटन ५५ हजार रुपये होता. परंतु रशिया आणि युक्रेनमधील संघर्षांमुळे अनिश्चितता निर्माण झाल्याने तो आता ५९ हजार रुपयांवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर या दोन्ही देशांचा या उद्योगांशी संबंध आहे. जगातील काही देशांना रशिया आणि युक्रेनमधून लोह खनिज आणि मॅग्नीज खनिजाचा पुरवठा होतो. युक्रेनमधून काही देशांत लोखंडी सळय़ा तयार करणाऱ्या बिलेंटचा पुरवठा होतो. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियामधून या उद्योगासाठी लागणारा विशिष्ट प्रकारचा कोळसा आणि स्क्रॅपचा पुरवठा जगातील काही देशांत होतो. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जगात लोखंडी सळय़ा उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठय़ाची साखळी अधिक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याकडे लोखंडी सळ्यांच्या भावात वाढ झाली आहे.
मेटारोल इस्पातचे कार्यकारी संचालक डी. बी. सोनी यांनी सांगितले,की लोखंडी सळय़ा उद्योगाचा लोह आणि मॅग्नीज खनिजांशी संबंध आहे. ऑस्ट्रेलियानंतर युरोपातील आणि आसपासच्या देशांना या खनिजांचा पुरवठा करणारा युक्रेन हा देश आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाचे सावट निर्माण झाल्यापासून अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले. १०-१२ दिवसांपूर्वी या सळय़ांची म्हणजे टीएमटी (थर्मो मेकॅनिकल ट्रीटेड) सळय़ांचा भाव जेवढा होता त्यामध्ये आता चार हजारांची वाढ झाली. जगातील अनेक देशांमध्ये या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठय़ाची श्रंखला अनिश्चिततेच्या वळणावर पोहोचल्याचा हा परिणाम आहे. ही अनिश्चितता पुढील काळात कशी राहील यावर लोखंडी सळय़ांचे भाव अवलंबून राहतील, असे सध्याचे चित्र आहे.