शहरातील गोदाकाठालगतच्या अनेक भागात पुरात गाळ व कचरा वाहून आला. परिसरातील अनेक रस्ते चिखलमय झाले.
पुरानंतर आता स्वच्छतेचे आव्हान
नाशिक : अवघ्या जिल्ह्यास झोडपून काढणाऱ्या पावसाने गुरुवारी बहुतांश भागात उघडीप घेतली. आदल्या दिवशी सायंकाळनंतर पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे गोदावरी व कादवाचा पूर ओसरला. शहरातील गोदाकाठालगतच्या अनेक भागात पुरात गाळ व कचरा वाहून आला. परिसरातील अनेक रस्ते चिखलमय झाले. यातून मार्गस्थ होताना अनेक वाहनधारक घसरून पडले. गोदावरी काठावरील परिसरात महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली.
बुधवारी अनेक भागांना पावसाचा तडाखा बसला होता. १५ धरणांमधून मोठय़ा प्रमाणात विसर्ग करण्यात आला. गोदावरी आणि कादवा नदीच्या पुराने काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसाचा जोर ओसरल्याने पाटबंधारे विभागासह अन्य यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. रात्रीपासून टप्प्याटप्प्याने धरणातील विसर्ग कमी केला जाऊ लागल्याने गोदावरीची पातळी कमी झाली. सकाळी नियमित स्वरूपात प्रवाह सुरू होता. गुरुवारी गंगापूर धरणातून केवळ २८५ क्युसेकचा विसर्ग होता. पुरामुळे गोदावरी नदीवरील पूल आणि काठालगतच्या भागात मोठय़ाप्रमाणात गाळ व कचरा वाहून आला आहे. पाण्यात बुडालेली मंदिरे व रामकुंड परिसराच्या स्वच्छतेचे काम अग्निशमन विभागाने तातडीने हाती घेतले. होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल दरम्यान ठिकठिकाणी अडकलेला तीन टन कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी काढला.
शहरात गोदाकाठालगत अनेक रस्ते आहेत. त्यातील काही इतके चिखलमय झाले की, त्यावरून मार्गस्थ होणे अवघड बनले आहे. गाडगे महाराज धर्मशाळेसमोरील रस्त्यावर वाहनधारकांची चांगलीच कसरत झाली. चिखलात घरून अनेक जण पडले. स्वच्छता होईपर्यंत अथवा उन्हाची तीव्रता वाढून चिखल सुकेपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्याची अवस्था व घसरून पडणारे पाहून काहींनी पर्यायी मार्गावरून जाणे पसंत केले.
विसर्गही ओसरला..
मागील २४ जिल्ह्यांत १८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर या भागात पावसाची नोंद झाली. अनेक भागात गुरुवारी सूर्यदर्शन झाले. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहते की काय, अशी धास्ती होती. तथापि, मागील दोन दिवसात ही कसर भरून निघाली. एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १५ हजार ७०८ मिलीमीटर पाऊस झाला. गतवर्षी हेच प्रमाण १६ हजार २८५ इतके होते. गुरुवारी अन्य धरणांमधील विसर्गात मोठी घट झाली. दारणामधून ११००, गौतमी गोदावरी १००, कडवा २१०, नांदूरमध्यमेश्वर ६३१०, आळंदी १२०, पालखेड १३११, वालदेवी १८३ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.