राजकीय पक्षांच्या विद्यार्थी शाखा आंदोलनाच्या रिंगणात

अंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाइन देताना विद्यार्थ्यांंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परीक्षेचा प्रश्न निकाली निघाल्याचे वाटत असताना परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी काही विद्यार्थी संघटनांनंतर आता राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी शाखाही आंदोलनाच्या रिंगणात उतरल्या आहेत. सोमवारी विद्यापीठ आणि यूजीसीने ऑनलाइन तसेच ऑफलाइन परीक्षांच्या यंत्रणेत सुधारणा करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने येथील बी.वाय.के . महाविद्यालयाबाहेर आंदोलन के ले.  मागण्या मान्य न झाल्यास विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

विद्यापीठ अंतर्गत अंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाइन देताना विद्यार्थ्यांंना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळेअभावी तसेच इतर त्रुटींमुळे विद्यार्थ्यांंचा मानसिक छळ होत आहे. यावर उपाययोजना करण्यास विद्यापीठ आणि यूजीसी सपशेल अपयशी ठरल्यामुळे या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अ‍ॅड. चिन्मय गाढे, शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली बी.वाय.के . महाविद्यालयाबाहेर करोना संदर्भातील सर्व शासकीय सूचनांचे पालन करून निदर्शने करण्यात आली.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या. परंतु या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांंना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांचा मानसिक छळ होत आहे. विद्यापीठाच्या नियोजनशून्यतेमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.  ऑनलाइन परीक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांंवर तणाव येत आहे.  भ्रमणध्वनीशी संपर्काचा अभाव आणि त्यावर मात केली की ऑनलाइन  पेपरचे लॉगइन न होणे,  लॉगइन झाले की पेपर न दिसणे आणि पेपर दिसलाच तर तो संके तस्थळावर टाकता न येणे, विद्यार्थ्यांंना प्रश्न न दिसणे, संके तस्थळावर फक्त काहीच पर्याय येतात.  वेळोवेळी विद्यापीठाचे संके तस्थळ हॅक होते. संके तस्थळातील अडचणींमुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नसल्याने  विद्यार्थ्यांंना कित्येक तास ताटकळत राहावे लागते. परीक्षार्थी विद्यार्थ्यांंची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची मदतवाहिनी सतत व्यस्त असते. नियोजित वेळेच्या कित्येक तासानंतर संके तस्थळावर पेपर दिसतो. काही विषयांच्या प्रश्नपत्रिका अगदी रात्री उशिरा सुरू होतात. तर काही वेळेस पेपर पुढेही ढकलावा लागतो. एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांच्या प्रश्नपत्रिका न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परीक्षा घेण्याची गरज होती. त्यामुळे सव्‍‌र्हरवर ताण आला नसता. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम असल्याचे वाटत नसल्यामुळेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभाराचा आणि ढिसाळपणाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापुढेही परीक्षा अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. याप्रसंगी विद्यासागर घुगे, किरण जगझाप, तुषार जाधव, चेतन देशमुख, आकाश कोकाटे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल