उत्खननात सापडलेल्या या पुरातन शिव मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड असून हे मंदिर मोठ मोठ्या दगडांनी बांधलेले आहे अशीही माहिती समोर आली आहे.
सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक समाधीचं जीर्णोद्धाराचं काम सुरु असताना १३ व्या शतकातील यादवकालीन पूर्व शिवमंदिर आढळून आलं आहे. महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मंदिराची पाहणी केली. सोळाव्या शतकातले राजे लखुजीराव जाधव यांच्यासह त्यांची तीन मुलं आणि नातू यांच्याही समाधी या ठिकाणी आहेत. त्यांच्या जतन आणि संवर्धनाचं काम करत असताना हे शिवमंदिर आढळून आलं आहे.
उत्खननात सापडलेल्या मंदिरात महादेवाची पिंड
उत्खननात सापडलेल्या या पुरातन शिव मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड असून हे मंदिर मोठ मोठ्या दगडांनी बांधलेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. तर मंदिराखाली दगडी फरशी सुद्धा बसवण्यात आल्याचं दिसून येतं आहे. या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून, उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपितं समोर येऊ शकतात असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. उत्खननात मंदिराचे जे अवशेष मिळाले त्यात शंकराच्या मंदिराचा गाभारा आणि सभामंडप असंही आढळून आलं आहे.
पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मलिक यांनी काय सांगितलं?
लखुजीराव जाधव यांच्या समाधीचा जिर्णोद्धार आम्ही मागच्या वर्षी सुरु केला होता. या ठिकाणी बराच माती आणि दगडांचा ढिगारा होता. तो काढत असताना आम्हाला हे मंदिराचे काही अवशेष आढळले. त्यानंतर मंगळवारी हे मंदिर आढळून आलं. या मंदिराचं दार, दाराच्या आतमध्ये असलेली शिळा या सगळ्यांवर यादवकालीन उल्लेख कोरलेले आहेत. त्यामुळे हे यादवकालीन मंदिर असावं. मोठ्या दगडांनी हे मंदिर बांधण्यात आलं आहे. मंदिराचा गाभारा, मंदिराचा सभामंडप या गोष्टी आढळल्या आहेत. लखुजीराव जाधव यांची समाधी मंदिराच्या मागे आहे. तर मंदिराच्या सभा मंडपाच्या वर काही समाधी आढळल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की या समाधी इथे बांधण्याच्या आधीच्या काळातलं हे मंदिर आहे.
समाधी स्थळाच्या ठिकाणी रामेश्वर मंदिर हे आधीपासून आहे. असं असू शकतं हे मंदिर आणि रामेश्वर मंदिर एकाच काळातलं असावं. मात्र याची आम्ही माहिती घेत आहोत. आणखी काय काय पुरावे आढळतात त्यावर या मंदिराचा काळ कुठला ते निश्चितपणे सांगता येईल पण हे तेराव्या शतकातलं मंदिर असावं असा अंदाज आम्हाला आहे. अशी माहिती पुरातत्व खात्याचे अधिकारी अरुण मलिक यांनी दिली आहे.