राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली होती.
राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली होती. या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांचं बोलणं हे नेहमीच खालच्या पातळीवरचं असतं, असं ते म्हणाले. विधिमंडळ परिसरात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले दीपक केसरकर?
संजय राऊतांचं बोलणं हे नेहमीच खालच्या पातळीवरचं असतं. हल्ली कोणीही संजय राऊतांची दखल घेत नाही. आज त्यांना राज्यात कोणीही किंमत देत नाही, असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं. पुढे बोलताना, राऊतांनी आमदार कुल आणि दादा भुसेंवर केलेल्या आरोपांबाबतही प्रतिक्रिया दिली. भ्रष्टाचार केल्याच आरोप करणं हा एक भाग असतो आणि त्यात काही तथ्य असणं ही वेगळी गोष्ट असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपावर संबंधित नेते उत्तर देतील. फक्त राजकारण म्हणून कोणाला तरी बदनाम करण्याच प्रयत्न होऊ नये. कारण महाराष्ट्राचं राजकारण नेहमी जनतेच्या हिताचं राहिलं आहे. पण आज ते व्यक्तिगत पातळीवर उतरत आहे, यापेक्षा दुर्देवी गोष्ट नाही, असेही ते म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
बार्शीतील प्रकरणी संजय राऊतांनी पीडित मुलीचा फोटो ट्वीट केला होता. त्यानंतर संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून त्यांनी शिंदे सरकार जोरदार टीका केली. “मी त्या मुलीचं नाव, तिच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी काहीही बोललेलो नाही. फक्त ‘माननीय मुख्यमंत्री या मुलीचं सांडलेलं रक्त वाया जाऊ देऊ नका’ इतकंच म्हटलं. यावर जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल, तर राज्यातला कायदा कोणत्या पद्धतीने काम करतोय, हे स्पष्ट दिसेल. आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन कली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हिडीओवरून एसआयटी स्थापन केली जाते. पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका मुलीचा फोटो ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो. या राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचतेय ते यातून स्पष्ट दिसतंय”, असे ते म्हणाले होते.