राज्यातील गारव्यात दोन दिवसांनंतर पुन्हा वाढ

राज्यात गेल्या आठवड्यात निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली होती.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला आहे. बहुतांश भागात किमान तापमान सारसरीप्रमाणे आहे. ही स्थिती दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात तुरळक भागांत हलक्या सरींचीही शक्यता आहे. दोन दिवसांनंतर ढगाळ स्थिती दूर होणार आहे. मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भागातील तापमानातही घट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सर्व भागांत १६ नोव्हेंबरपासून तापमानात पुन्हा घट होऊन थंडी वाढेल.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

सलग चवथ्या दिवशी पुणे राज्यात थंड

सध्या राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असली, तरी पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत अद्यापही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांनी कमी आहे. पुणे शहरामध्ये सलग चार दिवसांपासून राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. पुण्यात रविवारी १३.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदिवले गेले. त्या पाठोपाठ महाबळेश्वर येथे तापमानाचा पारा १३.४ अंशांवर होता. रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, नागपूर, अमरावती आदी भागांतही रात्री काही प्रमाणात गारवा आहे. त्यात दोन दिवसांनंतर आणखी घट होईल.