“राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य”

“वीजदरात २ टक्के नव्हे; सरासरी २ पैसे कपात”

राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य आहे. सर्व वीज ग्राहकांचा सरासरी देयक दर ७.२८ रुपयेवरुन ७.२६ रुपये प्रति युनिट होणार असून सरासरी कपात दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के होणार आहे. त्यामुळे नवीन काहीही घडलेले नाही, असे मत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले आहे.

“मुळात राज्य सरकार, आयो वा महावितरण कंपनीने नवीन काही केलेलं नाही. आयोगाने गेल्यावर्षीच पुढील पाच वर्षासाठी बहुवर्षीय दरनिश्चिती आदेश जाहीर केला आहे. त्यामधील ही आकडेवारी आहे. काही ठराविक वर्गवारीतील ग्राहकांचा एकूण सरासरी देयक दर एक ते चार टक्के कमी झाला आहे. एकूण घट, कपात ही फक्त सरासरी दोन पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३ टक्के इतकीच आहे. तसेच, इंधन समायोजन आकाराचे अद्याप प्रमाणीकरण व निर्धारण व आकारणी झालेली नाही. ती झाल्यानंतरच कपात की वाढ हे चित्र स्पष्ट होणार आहे. एप्रिल २०२२ नंतर महावितरण कंपनी फेरआढावा याचिका दाखल केल्यावर २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षात वीज ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसणार हे निश्चित आहे,” असे होगाडे म्हणाले.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

“मुळातच महाराष्ट्रातील घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शेती पंप या सर्व वर्गांचे वीजदर देशात सर्वात जास्त असताना ०.३ टक्के कपात काहीच नाही. प्रशासकीय खर्चात कपात व २४ तास वीज देण्याच्या महत्वाच्या आव्हानांकडे राज्य सरकार, आयोग व कंपनी यांनी लक्ष द्यावे,” अशी अपेक्षा होगाडे यांनी व्यक्त केली आहे.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले