राज्यातील शून्य ते वीस  पटसंख्येच्या शाळांना टाळे?

शासकीय पत्रातूनच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे.

पुणे : राज्यातील शून्य ते वीस विद्यार्थिसंख्या असलेल्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याची विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे याची माहिती शालेय शिक्षण विभागाने मागवली आहे. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा राज्य शासनाकडून बंद केल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

करोनामुळे अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत वित्तीय उपाययोजना करण्याअंतर्गत पदभरती बंदीच्या अनुषंगाने विविध विषयांबाबतची माहिती आणि स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी शिक्षण आयुक्त आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षण संचालकांकडून मागवली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न या पूर्वीही शासनाकडून झाले होते. मात्र त्या वेळी शिक्षण क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात टीका करण्यात आली, तसेच विरोधही झाला. आता शासकीय पत्रातूनच कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. जिल्हानिहाय विद्यार्थिसंख्या, संचमान्यतेनुसार मंजूर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे याबाबतची माहिती, जिल्हानिहाय अतिरिक्त शिक्षक असल्यास त्या शिक्षकांची माहिती, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती २८ ऑगस्ट २००५च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेनुसार शिक्षक पदांची मागणी केली आहे किंवा कसे, राज्यात शून्य ते वीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याची विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे हे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!