राज्यात २०१६ पूर्वी विदर्भातील सात जिल्हे हे उष्माघातप्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. यात आता मोठी भर पडत असून, विदर्भातील ११ जिल्हे, मराठवाडय़ातील नांदेड व लातूर आणि खानदेशातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे.
प्रदीप नणंदकर
लातूर : राज्यात २०१६ पूर्वी विदर्भातील सात जिल्हे हे उष्माघातप्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. यात आता मोठी भर पडत असून, विदर्भातील ११ जिल्हे, मराठवाडय़ातील नांदेड व लातूर आणि खानदेशातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांचा समावेश आहे. सुमारे १५ जिल्हे उष्माघातप्रवण जिल्हे असल्याचे दिसून आल्याचे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज यांनी तयार केलेल्या कृती आराखडय़ातून स्पष्ट झाले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करून तीव्र, मध्यम व कमी स्वरूपाच्या उष्णतेच्या लाटेचे काय परिणाम होत आहेत याचा अभ्यास केला जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, उत्तर भारतात दर वर्षी पाच ते सहा वेळा उष्णतेची लाट येते. त्याचा फटका थेट पाण्याच्या उपलब्धतेवर होतो. दरडोई पिण्याचे पाणी १ हजार ८२० घनमीटर उपलब्ध होते ते आता केवळ १ हजार १४० घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध होणार आहे. सन २०१५ मध्ये महाराष्ट्राला मोठय़ा दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्या वेळी सहा ते आठ सेल्सिअस अंश इतके तापमान वाढलेले होते. तेव्हा तापमानामुळे देशभरातील मृत्यूचे प्रमाण २ हजार ४२२ होते. ग्रामीण भागातील आकडेवारी नीटशी उपलब्ध असत नाही.
उष्माघाताचा विचार करताना तापमानाव्यतिरिक्त हवेतील आद्र्रता, धुळीचे कण व हवेचे प्रदूषण यांसारखे मुद्दे विचारात घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक व वातावरणीय बाबींचा विचार करून नियोजन करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांना दिलेले आहेत. सलग दोन दिवस सामान्य तापमानापेक्षा ४.५ सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची वाढ झाली, तर ती उष्णतेची लाट असे समजून होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मानवी शरीरावर विशेषत: झोपडपट्टीत राहणारे, रस्त्याशेजारील विक्रेते, फिरते विक्रेते, बाजार समितीमध्ये काम करणारे, आठवडा बाजारातील विक्रेते, बसस्थानक, रेल्वेस्थानक, यात्रेच्या ठिकाणी, विविध धार्मिक स्थळे या ठिकाणी भेट देणारे, वयोवृद्ध, लहान मुले यांच्यावर उष्णतेचा परिणाम होतो. त्यानुसार त्याची काळजी घेण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
तापमान वाढीचा अंदाज
देशात आत्तापर्यंत उष्माघाताने सर्वाधिक ३ हजार २८ मृत्यू हे १९९८ मध्ये झाले आहेत. १९९२ ते २०१५ या कालावधीत २२ हजार ५६२ मृत्यू उष्माघाताने झाले. राज्यातील ३६ जिल्ह्यांतही उष्णतेची लाट एप्रिल ते मे या दोन महिन्यांत येते व त्याचा थेट परिणाम होतो. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २०७० पर्यंत अमरावती विभागात ३ ते ३.४६, नागपूर विभागात २.८८ ते ३.१६, पुणे विभाग २.४६ ते २.७४, छत्रपती संभाजीनगर ३.१४ ते ३.१६ सेल्सिअस तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे.
१० वर्षांतील सरासरी तापमान ४१.७३
गेल्या १० वर्षांतील राज्यातील सर्वाधिक तापमान असलेल्या ३६ जिल्ह्यांपैकी २४ जिल्हे असे आहेत, की ज्यांचे तापमान ४० सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले. त्यात सर्वाधिक तापमान यवतमाळ ४५.५३, चंद्रपूर ४५.३१, गोंदिया ४५.०१, वर्धा ४४.९३, वाशिम ४४.६३, बुलडाणा ४४.३५, अमरावती ४४.२८, भंडारा ४४.२६ या जिल्ह्यांचा उल्लेख करावा लागेल. सर्वात कमी तापमान राहिलेला सिंधुदुर्ग ३६.४८ हा जिल्हा आहे. राज्याचे गेल्या १० वर्षांतील सरासरी तापमान ४१.७३ इतके आहे.
प्रदीप नणंदकर