जून महिन्यात राज्यात सरासरी २०९.८ मिमी पाऊस पडतो. पण, यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघा ५४ टक्केच पाऊस झाला.
पुणे : राज्यात जूनमध्ये सरासरीच्या अवघा ५४ टक्केच मोसमी पाऊस पडला असून मराठवाडय़ात त्याची नोंद अत्यल्प म्हणजे सरासरीच्या केवळ ४१ टक्केच झाली आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, अशा सर्वच विभागांत पावसाची तूट आहे. जूनमध्ये पालघरमध्ये सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वात कमी पाऊस पडला.
यंदा ११ जुलै रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. मात्र, फारसा जोर नसल्यामुळे २३ जूनपर्यंत मोसमी पाऊस तळकोकणातच रेंगाळला होता. २४ जूनला तो विदर्भात दाखल झाला. २५ जूनला पावसाने वेगाने प्रगती करून पुण्या, मुंबईसह राज्य व्यापले. साधारण २५ जूनपासून राज्याच्या बहुतेक भागांसह किनारपट्टीवर मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. पण, जूनच्या अखेरीस सक्रिय झालेला पाऊस जूनची सरासरी भरून काढू शकला नाही.
जून महिन्यात राज्यात सरासरी २०९.८ मिमी पाऊस पडतो. पण, यंदा जूनमध्ये सरासरीच्या अवघा ५४ टक्केच पाऊस झाला. कोकण विभागात सरासरी ७०१.१ मिमी पाऊस पडतो.
यंदा ५०२.९ मिमी पाऊस पडला. कोकणातील पावसात २८ मिमीची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात १५७.७ मिमी पाऊस पडतो, यंदा तो केवळ ७७.४ मिमी झाला असून ५१ मिमीची तूट आहे. मराठवाडय़ात सरासरी १३४.७ मिमी पाऊस पडतो, यंदा ४१.३ मिमी पाऊस झाला आहे. मराठवाडय़ात ६९ मिमी पावसाची तूट आहे.
पावसाने देश व्यापला
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा सहा दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे. देशात सर्वदूर मोसमी पावसाच अनुकूल वातावरण आहे. पुढील पाच दिवस देशाच्या बहुतेक भागांत चांगला पाऊस पडेल, असे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.