फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख हजारांच्याही खाली गेला होता. मार्चमध्ये तर हा आलेख पाचशेपर्यत घटला आहे.
मुंबई : राज्यात करोनाची तिसरी लाट ओसरत आली असून दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्यूच्या प्रमाणातही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. राज्यात सहा हजार रुग्ण उपचाराधीन असून दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास एक टक्क्यापर्यंत कमी झाले आहे.करोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये राज्यात वेगाने पसरत होती, त्यावेळी सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ३३ हजार ५०० होती. फेब्रुवारीमध्ये यात मोठय़ा प्रमाणात घट होऊन ती पाच हजारापर्यत कमी झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख हजारांच्याही खाली गेला होता. मार्चमध्ये तर हा आलेख पाचशेपर्यत घटला आहे. जानेवारीत राज्यात १० लाख ३८ हजार रुग्ण नव्याने आढळले होते, तर फेब्रुवारीमध्ये यात मोठी घट झाली असून सुमारे १ लाख ४४ हजार रुग्ण आढळले आहेत.
मृतांच्या संख्येतही जानेवारीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने घट झाली आहे. जानेवारीत राज्यात १ हजार ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारीमध्ये मात्र हे प्रमाण ७३७ पर्यत घटले. मागील काही दिवसांमध्ये दैनंदिन मृतांची संख्याही दहापेक्षा कमी झाली आहे. राज्यात सध्या ६ हजार १०० उपचाराधीन रुग्ण असून सर्वाधिक २ हजार १७७ रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नगर,ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. देशभरात सध्या सर्वाधिक सुमारे २७ हजार उपचाराधीन रुग्ण केरळमध्ये आहेत. यानंतर मिझोरम आणि महाराष्ट्राचा समावेश आहे
राज्यात गुरुवारी ४६७ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे, तर १ हजार १४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बाधितांच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के झाले आहे. राज्यात सध्या ४२ हजार ११८ जण गृहविलगीकरणात तर ६०२ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
मुंबईत सर्व रुग्ण ओमायक्रॉनबाधित
मुंबई : मुंबईत तिसऱ्या लाटेमध्ये वेगाने पसरलेल्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव संपूर्ण शहरात झाला असून सध्या आढळणाऱ्या सर्व रुग्णांना करोनाच्या याच प्रकाराची लागण झाल्याचे पालिकेने केलेल्या जनुकीय चाचण्यांमधून दिसून आले आहे. जनुकीय चाचण्यांची दहावी फेरी नुकतीच झाली असून यात ३७६ रुग्णांचे नमुने घेतले होते. यातील २३७ नमुने मुंबई क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे मुंबई बाहेरील होते. मुंबईतील सर्व नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले आहे. २३७ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २५ नमुन्यांचा समावेश होता. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ बाधित असल्याचे आढळून आले. रुग्णांना कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.