राज्यात बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवर

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात राज्यभर, प्रतिदिन सरासरी ८० हजार चाचण्या केल्या जात होत्या.

मुंबई : राज्यात आठवडय़ाभरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने झाला असून बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवर पोहोचले, तर रुग्णसंख्या ९० हजारांवरून दीड लाखांवर गेली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये याच वेगाने रुग्णवाढ झाल्याचे आढळले होते. तुलनेत मृत्यूदर २.१७ टक्क्यांवर नियंत्रित आहे.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात राज्यभर, प्रतिदिन सरासरी ८० हजार चाचण्या केल्या जात होत्या. आता चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून दररोज एक लाख ३० हजार चाचण्या केल्या जात आहेत. आठवडय़ाआधी बाधितांचे प्रमाण १३ टक्के होते. या आठवडय़ात ते जवळपास २० टक्क्यांवर पोहोचले. या आठवडय़ात रुग्णसंख्या १,५१,३५४ झाली. गेल्यावर्षी सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवडय़ात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रुग्णनिदान केले जात होते. हा रुग्णवाढीचा उच्चांक होता.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

गेल्या सप्टेंबरमध्ये मृत्यूचे प्रमाण २.८१ टक्के होते, तर आठवडय़ातील मृत्यूचे प्रमाण सुमारे दोन टक्के होते. त्यातुलनेत सध्याचा मृत्यूदर कमी २.१७ टक्के आहे, तर आठवडय़ाचा मृत्यूदर एक  टक्कय़ाच्या खाली आहे.

रुग्णसंख्या वाढीमध्ये अकोला अजूनही अग्रस्थानावर आहे. अकोला शहरात २० टक्कय़ांहून अधिक रुग्णसंख्या वाढली, तर ग्रामीण भागात प्रमाण १३ टक्कय़ांनी वाढली आहे. त्याखालोखाल नागपूर ग्रामीण भागात १९ टक्कय़ांनी आणि शहरी भागात ११ टक्कय़ांनी रुग्णवाढ झाली आहे. विदर्भात यवतमाळ(१२ टक्के), बुलढाणा(१४ टक्के), वाशिम(१३ टक्के) आणि वर्धा(१४ टक्के) येथील संसर्ग वाढ अजूनही कायम आहे.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

आधीच्या अबाधित भागांत प्रादुर्भाव अधिक : डॉ. आवटे

नंदुरबाद, यवतमाळ, अकोला इत्यादी जिल्ह्य़ांमध्ये पाहणी करण्यात आली असून चाचण्या आणि बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांना शोधण्यावर भर देण्यात येत आहे. या बहुतांश भागांमध्ये पहिल्या लाटेत जे भाग बाधित झाले नाहीत, ते भाग आता अधिक बाधित होत असल्याचे दिसत आहे, असे राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.