मुंबई पहिल्या, नागपूर दुसऱ्या तर पुणे तिसऱ्या स्थानावर
अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात गेल्या आठ महिन्यात गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. हत्याकांडांच्या घटनेत मुंबई शहर पहिल्या स्थानावर तर नागपूर दुसऱ्या स्थानावर आहे. पुणे आणि ठाणे या शहरांचा तिसरा व चौथा क्रमांक आहे. मुंबईत सर्वाधिक ८५ हत्याकांड तर नागपुरात (५७) हत्याकांड घडले आहेत. ही माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.
गेल्या आठ महिन्यात राज्यात खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना सर्वाधिक आहेत. घडलेल्या हत्याकांडासाठी अनेक प्रकारची कारणे देण्यात आली आहेत. त्यात वैमनस्य, टोळीयुद्ध, राजकीय द्वेष, युवक-युवतीमधील प्रेमसंबंध, विवाहित महिला व पुरुषांचे असलेले अनैतिक संबंध, धार्मिक तेढ, कौटुंबिक वाद, संपत्तीच्या वादासह अन्य कारणांचा समावेश आहे. परंतु, राज्यात सर्वाधिक हत्याकांड विवाहितांच्या अनैतिक संबंधातून घडलेले आहेत. पत्नीशी अन्य पुरुषांचे किंवा पतीचे अन्य विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधातूनही सर्वाधिक हत्याकांड राज्यात घडले आहे. पत्नीचे प्रियकरासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत पतीला कुणकुण लागल्यामुळे खून केल्याच्या घटनांमध्येसुद्धा वाढ झाल्याची नोंद आहे. गेल्या आठ महिन्यात राज्यात मुंबईत सर्वाधिक ८५ हत्याकांड घडले असून १८४ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घडना घडल्या आहे. नागपुरात ५७ हत्याकांड तर ७५ जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे शहरात ५४ खून तर १६५ हत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ठाणे शहरात ४८ खून आणि ९१ खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहे. हत्याकांडाच्या घटना बघता राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्रतिबंधात्मक कारवायांचा अभाव
पोलीस ठाण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केल्यास पोलीस गांभीर्य दाखवत नाहीत. अशा तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ होते. तसेच गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया वेळेवर होत नाहीत. त्यामुळेसुद्धा गुन्हेगारांची हिंमत वाढते.
टोळीयुद्धांमध्ये वाढ
मुंबई, ठाणे आणि नागपुरात गुन्हेगारांच्या टोळ्या नव्याने निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी टोळीवर वर्चस्व ठेवण्यासाठी गुन्हेगार प्रयत्न करतात. याच कारणातून गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध घडत आहेत. यातूनही अनेक हत्याकांड राज्यात घडल्याची माहिती समोर आली आहे.