संपूर्ण राज्य दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळांमध्ये होरपळत असताना महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना उर्फ शिवसागर धरण अद्याप ५० टक्के (५२.६७ टीएमसी) भरलेले आहे.
विजय पाटील
कराड : संपूर्ण राज्य दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळांमध्ये होरपळत असताना महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना उर्फ शिवसागर धरण अद्याप ५० टक्के (५२.६७ टीएमसी) भरलेले आहे. गेल्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरलेले नसताना आणि चालू वर्षी उन्हाची तीव्रता अधिक असतानाही हा साठा समाधानकारक आहे. दुष्काळाची चाहूल लागल्यामुळे सुरुवातीपासूनच पाण्याचे चांगले नियोजन केल्यामुळे धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे.
यंदा मार्च महिन्यातच राज्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. राज्यातील छोटे-मोठे जलसाठे, ओढे, नाले कोरडे पडले असून, धरणांतील साठाही चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. असे असताना शिवसागराची स्थिती मात्र समाधानकारक आहे. या धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. येथील पाण्याचा वापर शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी केला जातो. सातारा, सांगलीसह मोठय़ा प्रदेशातील सिंचन कोयनेवर अवलंबून आहेत. जलविद्युत निर्मितीचा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प कोयनेवर आहे. राज्याला लागणाऱ्या एकूण विजेच्या मागणीपैकी मोठा वाटा कोयनेत तयार होणाऱ्या वीज निर्मितीचा आहे. गेल्या वर्षी हंगाम संपतेवेळी धरणात ८९.०९ टीएमसी पाणी जमा झाले. भरपूर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात असूनही कोयना शंभर टक्के भरले नाही. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाण्याचे नियोजन आणि वितरण निश्चित केले व त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. विसर्ग आणि जलाशय छेद प्रक्रियेमुळे (लेक टॅपिंग) तळापर्यंतच्या पाण्याचाही उर्जा निमिर्तीनंतर सिंचनासाठी पुनर्वापर करण्यात आला. संभाव्य दुष्काळ विचारात घेऊन विसर्गाचे प्रमाण आणि वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले. या उपाययोजनांमुळे अन्य धरणे मृतसाठय़ावर गेली असताना कोयनेत मात्र अद्याप ५२. ६७ टीएमसी (५० टक्के) साठा आहे. यामध्ये वापरात येणारा साठा हा ४७.४६ टीएमसी (४५.०९ टक्के) आहे. हे पाणी वीजनिर्मिती, सिंचन व पिण्यासह अन्य वापरासाठी जुलैपर्यंत पुरेल, असे कोयना सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.पाण्याचे उत्तम नियोजन केल्यामुळे कमी पाऊस आणि तीव्र उन्हाळा अशी स्थिती असतानाही शिवसागर धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढे पाणी शिल्लक आहे.
१९७२ च्या दुष्काळावेळी पावसाळय़ाअखेर कोयनेचा जलसाठा ८९.७९ टीएमसी होता. गेल्यावेळी तो त्यापेक्षाही कमी राहिल्याने चिंता व्यक्त होत होती. संभाव्य दुष्काळ याच्या भीतीने पाण्याचे नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे समाधानकारक जलसाठा आम्ही टिकवू शकलो. – नितीश पोतदारकार्यकारी अभियंता, कोयना सिंचन प्रकल्प