राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा केंद्राकडून प्रयत्न -संजय राऊत

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी त्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याकडे लक्ष वेधले.

नाशिक : मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) जाणार असल्याचा राज्य सरकारला कोणताही धक्का बसलेला नाही. मुंबई पोलीस, दहशतवादी विरोधी पथक अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यास सक्षम असताना या प्रकरणांमध्ये एनआयएने घाईघाईत येण्याची गरज नव्हती. केंद्रातील भाजप सरकार राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी संधी शोधत आहे; परंतु त्यांनी अगदी ‘सीआयए’, ‘केजीबी’ला आणले तरी राज्य सरकारला फरक पडणार नसल्याचे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी येथे सांगितले.

शहरात आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई पोलीस दलातील घडामोडींविषयी उपस्थित झालेल्या प्रश्नावर त्यांनी मुंबई पोलीस दल समर्थ असून त्यांना नवे सक्षम नेतृत्व मिळाल्याचे नमूद केले. मुंबई पोलिसांची कीर्ती, प्रतिष्ठा जगात आहे. एखाद्या घटनेमुळे त्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही. मागील काही दिवसांत एखादी चूक झाली असेल तर  ती सुधारण्यासाठी आता नवीन रचना करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी त्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्याकडे लक्ष वेधले. देशातील अन्य राज्यांमध्ये चाचण्यांची बोंब आहे. महाराष्ट्रात लसीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. हाफकिन संस्थेत लसनिर्मितीची परवानगी मिळाल्यास राज्यासह देशातील लसीकरणास अधिक वेग येईल. ‘यूपीए’चे नेतृत्व शरद पवार हे उत्तम करू शकतात. सोनिया गांधी यांनी सक्षमपणे नेतृत्व केले; परंतु अलीकडच्या काळात प्रकृतीच्या कारणास्तव त्या सक्रिय नाहीत. देशात अनेक प्रादेशिक पक्ष भाजपविरोधात असूनही यूपीएमध्ये नाहीत. अशा पक्षांना यूपीएमध्ये सहभागी करून घेण्यास पवार हे महत्त्वाची भूमिका निभावतील. पश्चिम बंगालमध्ये देशाचे महाभारत घडत आहे. एका महिलेच्या विरोधात संपूर्ण केंद्र सरकार कामाला लागले आहे. इतकी धडपड करूनही तिथे बहुमत तृणमूल काँग्रेसलाच मिळेल.

हे वाचले का?  राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी समिती

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सहा जणांची सुकाणू समिती स्थापन केली जाणार आहे. स्थानिक पातळीवर आघाडी असो किंवा नसो, महापौर सेनेचाच होणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. जळगाव महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा आरोप भाजपकडून होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी पहाटेचा शपथविधी हा घोडेबाजारच होता, असा टोला लगावला.

हे वाचले का?  Ashadhi Ekadashi : ‘बळीराजाचे दुःख दूर कर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विठुरायाला साकडं; अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान