राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; परळी न्यायालयात आज हजर राहणार

२००८ साली झालेल्या दगडफेक प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. परळीतील एका प्रकरणात न्यायालयाने राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज ( १८ जानेवारी ) परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. सकाळी ११ वाजता राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

२००८ साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

परळी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र, न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध ६ जानेवारी २०२२ ला अजामीनपात्र वॉरंट काढत, १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणातील मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर राहत, अजामीनपात्र वॉरंट रद्द केलं होतं. पण, १३ एप्रिल २०२२ ला दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं. तसेच, १२ जानेवारी २०२३ ला हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, आज ( १८ जानेवारी ) राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार आहेत. न्यायालयाचे कामकाज झाल्यावर ते मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनेचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर सुमारे दुपारी दीड वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

हे वाचले का?  “बारावा खेळाडू, मिलिंद नार्वेकरांना…”, विधानपरिषदेच्या मतदानाआधी संजय शिरसाटांचं सूचक विधान