राम मंदिर मुद्द्यावरून भाजपा नेत्याचं उत्तर
“पहिले मंदिर फिर सरकार’ असं म्हणणाऱ्यांची भाषा सरकार आल्यावर बदलली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत राम मंदिर राजकारणापासून दूर ठेवायले हवे, अशी भाषा करत आहेत. तसेच राममंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याच्या मुद्द्यावरही टीका करत आहेत. त्यांचा मला सांगायचं आहे की राम मंदिरासाठी वर्गण गोळा केली जात आहे, खंडणी नव्हे…” अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
“आपण म्हणजे लोकं असा आव कोणी आणू नये, कारण आपण म्हणजे लोकं नाही, मुंबईकर नाही व महाराष्ट्रही नाही. आधी या भ्रमातून तुम्ही बाहेर या. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळेच ते असे बोलत आहेत. वर्गणी आणि शिवसेना यांचा संबंध फार जुना आहे. शिवसेनेचे अनेक सामाजिक उपक्रम, कार्यक्रम या वर्गणीच्या माध्यमातून व्हायचे. मुंबई व राज्यातील शिवसेनेच्या अनेक शाखांचे निर्माणही याच वर्गणीतूनच झाले आहे. त्यामुळे वर्गणी हे काय प्रकरण असे म्हणणाऱ्या राऊतांचे वक्तव्य म्हणजे ‘येड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाण्यासारखे आहे”, असं दरेकर म्हणाले.
“राममंदिराच्या उभारणीसाठी १ कोटींची वर्गणी काहींनी जाहीर केली पण त्यांनी दिली का नाही, ते माहित नाही. स्वयंसेवकांची नियुक्ती कोण करते असा सवालही राऊत यांनी केला आहे. पण माझा त्यांना सवाल आहे की शिवसैनिकांची नियुक्ती कोण करते? त्यांची नियुक्ती कोण करत नसतं तर सामाजिक बांधिलकीतून काम करणारा व पक्षाची विचारधारा पुढे नेणारा तो शिवसैनिक असतो. स्वयंसेवकाचीही नियुक्ती होत नसते. तर स्वयंसेवक हा राष्ट्रभक्तीचा एक अविष्कार आहे. देशभक्तीसाठी उत्स्फुर्त काम करणारा स्वयंसेवक असतो”, असे सडेतोड उत्तर त्यांनी दिलं.