अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा मुद्दा वापरून आपला जनाधार वाढवणाऱ्या भाजपची आता मंदिराच्या निधी संकलनासाठी मदत घेतली जात आहे. ग्रा.पं. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत सहभागी होऊन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी विदर्भातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना पावती पुस्तिकांचे वाटप केले.
सध्या महाराष्टात ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. या निमित्ताने भाजप कार्यकर्ते प्रचारासाठी घरोघरी फिरणार आहेत. त्यावेळी नागरिकांना मंदिरासाठी निधी दान करण्याचे आवाहन करावे, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर उभारणीला परवानगी देऊन हा मुद्दा निकाली काढला असला तरी वेगळ्या पद्धतीने तो जिवंत ठेवून त्याचा राजकीय वापर भाजपच्या माध्यमातून करण्याचा विश्व हिंदू परिषदेचा प्रयत्न असल्याचे दिसून यातून येत आहे.
दोनच दिवसापूर्वी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विदर्भातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची रेशीमबागेतील स्मृती भवनात बैठक घेतली. त्यात विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यात भाजप जिल्हाध्यक्षांना निधी संकलनासाठी पावती पुस्तिका देण्यात आल्या व जास्तीत जास्त निधी संकलन करा, असे सांगण्यात आले. याला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दुजोरा दिला.
देशभर मोहीम
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत देशभर निधी समर्पण अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली आहे. या निमित्ताने देशातील ४ लाख गावातील ११ कोटी कुटुंबापर्यंत पोहचून निधी संकलित करण्याचे नियोजन आहे. सर्वसामान्यांना योगदान देता यावे म्हणून १० रुपये, १०० रुपये आणि १,००० रुपयांच्या पावत्या तयार करण्यात आल्या आहेत. नागपुरात अलीकडेच यासाठी कार्यालय उघडण्यात आले आहे.
‘‘राम मंदिर उभारणीसाठी विदर्भातून जास्तीत जास्त निधी गोळा व्हावा म्हणून आम्ही फक्त भाजपच नव्हे तर संघ परिवारातील सर्वच संघटनांनांची मदत घेत आहोत. भाजपच्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही याबाबत आवाहन करण्यात आले आहे.’’ – गोविंद शेंडे, प्रांत मंत्री, विश्व हिंदू परिषद