राष्ट्रवादी भवनवर अजित दादा, भुजबळ समर्थकांचा ताबा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता या पक्षाचे शहरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून मंगळवारी छगन भुजबळ आणि शरद पवार समर्थकांनी समोरासमोर येत जोरदार घोषणाबाजी केली.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता या पक्षाचे शहरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून मंगळवारी छगन भुजबळ आणि शरद पवार समर्थकांनी समोरासमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. पवार गटाकडून कार्यालयाचा ताबा घेतला जाणार असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व मुख्यत्वे समता परिषदेतील भुजबळ समर्थकांनी कार्यालयात ठाण मांडले. दुपारी शरद पवार समर्थक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी नगरसेवक गजानन शेलार हे कार्यकर्त्यांसह बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी भवनवर पोहोचल्यानंतर वादाला तोंड फुटले. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने पोलिसांनी पवार गटाला प्रवेशास प्रतिबंध केला. अखेर संबंधितांनी लगतच्या एका हॉटेलकडे मोर्चा वळवून बैठक घेतली. तूर्तास राष्ट्रवादी भवनवर अजितदादा आणि भुजबळ समर्थकांनी ताबा मिळविल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर संघर्षाचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. मुंबई नाका परिसरात राष्ट्रवादी भवन हे पक्षाचे कार्यालय आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सलग दोन दिवस या कार्यालयात उत्साहवर्धक वातावरण नव्हते. पहिल्या दिवशी शुकशुकाट होता. दुसऱ्या दिवशी काही पदाधिकारी काही वेळासाठी आले होते. तिसऱ्या दिवशी मात्र हे चित्र पूर्णत: बदलले. मूळ राष्ट्रवादीने पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कार्यालयात बैठक घेण्याचे पत्राद्वारे सांगितले होते. त्या अनुषंगाने दाखल होणारे पवार समर्थक राष्ट्रवादी भवनचा ताबा घेतील, या शंकेने अजितदादा तसेच समता परिषदेतील भुजबळ समर्थक तडक कार्यालयात दाखल झाले. यात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, समता परिषदेचे दिलीप खैरे आदींचा समावेश होता. भुजबळ यांना मानणाऱ्या महिला आघाडीच्या सदस्याही पोहोचल्या. दोन्ही गटात वादाची चिन्हे लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. लोखंडी जाळ्या लावल्या. शिघ्र कृती दलाची तुकडी बोलावली गेली.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

दुपारी साडेतीनच्या सुमारास पवार समर्थक गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड आणि माजी नगरसेवक गजानन शेलार हे कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचले. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजितदादा आणि भुजबळ समर्थक कार्यालयात होते. तर शरद पवार समर्थक रस्त्यावर ठाण मांडून होते. कार्यालयात बैठक घेण्याचा पवार समर्थकांचा निर्धार होता. अर्धा ते पाऊण तास हा गोंधळ सुरू राहिला. पोलिसांनी आम्हाला कार्यालयात प्रवेशास प्रतिबंध केल्याची तक्रार जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी केली. कार्यालयात मुठभर कार्यकर्ते होते. राष्ट्रवादी भवन हे कुठल्या व्यक्तीचे नाही तर पक्षाचे कार्यालय आहे. आमच्याकडे पक्षाची बैठक घेण्याचे अधिकृत पत्र आहे. असे असूनही पक्ष कार्यालयात जाण्यापासून पोलिसांनी आम्हाला रोखल्याचे शरद पवार समर्थक सांगत होते. अखेरीस लगतच्या एका हॉटेलमध्ये संबंधितांची बैठक पार पडली.

हे वाचले का?  चार धरणे तुडुंब, नऊमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साठा, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ५७ टक्क्यांवर.

राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी वेल्फेअर फाउंडेशनचे कार्यालय आहे. बैठकीसाठी आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी पक्ष कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखले. नेत्यांच्या दबावाखाली यंत्रणा काम करीत आहे. बुधवारी मुंबईतील बैठक पार पडल्यानंतर पक्षाचे हे कार्यालय ताब्यात घेतले जाईल. -गजानन शेलार (शरद पवार समर्थक)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे कार्यालय आहे. या ठिकाणी आम्ही दररोज येतो. कार्यालयात आमचे कक्ष आहेत. बैठका होतात. दैनंदिन कामकाज चालते. असे असताना पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्याचे कसे म्हणता येईल ? या आरोपांमध्ये तथ्य नाही. संबंधित पदाधिकाऱ्यांनाही कार्यालयात येण्यापासून कुणी रोखले नाही. पण ते शेकडो लोकांना घेऊन काहीतरी गोंधळ घालण्याचा उद्देशाने आले होते. त्या लोकांचा पक्षाशी संबंध नव्हता. बुधवारी मुंबईत पक्षाची बैठक होणार आहे. या स्थितीत कुणाला पूर्वसूचना न देता स्थानिक मंडळी बैठक कशी व का घेत होती, हा प्रश्न आहे. -ॲड. रवींद्र पगार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक)