राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा : भवानी देवीला राष्ट्रीय विजेतेपद

गोव्याच्या चिंगोखाम जेटली सिंगने एपी प्रकारात बाजी मारली

रुद्रपूर : टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी (तमिळनाडू) हिने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भवानीने नवव्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

दिल्ली पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भवानीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला १५-७ असे पराजित केले. उपांत्य लढतीत भवानीने के. अनिताचा १५-४ असा सहज पाडाव केला. त्याआधी, भवानीने स्पर्धेस दिमाखदार सुरुवात करताना पहिल्या गटसाखळी सामन्यात जसप्रीत कौरला (जम्मू आणि काश्मीर) १५-२ असे सहज हरवले. परंतु भवानीचा तेलंगणाच्या बेबी रेड्डीने कस पाहिला. भवानीने ही चुरशीची लढत १५-१४ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भवानीने पंजाबच्या जगमीत कौरला १५-७ असे हरवून उपांत्य फेरी गाठली होती.

हे वाचले का?  ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मगावी क्रीडा संकुलासाठी अखेर २५.७५ कोटींचा निधी मंजूर

याचप्रमाणे सेनादलच्या कुमारसन पद्म गिशो निधीने गतविजेत्या करण सिंगला (राजस्थान) हरवून पुरुषांच्या सॅबर प्रकारातील वैयक्तिक विभागात विजेतेपद जिंकले. करण सिंगने नुकत्याच बुडापेस्टला झालेल्या पुरुषांच्या ‘सॅबर वर्ल्डकप’ स्पर्धेत भारतीयांमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती. या २० वर्षीय नवोदित गुणवान तलवारबाजाने जागतिक क्रमवारीत १९व्या असलेल्या कोन्स्टन्टाईन लोखानोवला नमवून बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. पण या कामगिरीची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्पर्धेत करण सिंगला करता आली नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

अवंती राधिका प्रकाश (केरळ) हिने महिलांच्या पॉइल वैयक्तिक प्रकारातील विजेतेपद राखले. तिने गतवर्षी कांस्यपदक जिंकलेल्या मणिपूरच्या लैशराम खुशबुराणीवर मात केली. गतवर्षी दिल्लीतील स्पर्धेत उपविजेतेपद जिंकलेली थॉबी वांगलेम्बाम देवी आणि तिची मणिपूरची सहकारी फॅमडोम अनिता चानू यांनी कांस्यपदक जिंकले.

गोव्याच्या चिंगोखाम जेटली सिंगने एपी प्रकारात बाजी मारली. गतवर्षी सहाव्या आलेल्या चिंगोखामने निर्णायक लढतीत छत्तीसगडच्या शांथीमोल शेरजीनला हरवले. चिंगोखामने २०१७च्या आशियाई कुमार आणि कॅडेट स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. गतवर्षी फॉइल प्रकारात  कांस्यपदक विजेत्या सेनादलाच्या अर्जुनने यंदा सुवर्णपदक जिंकले. त्याने अंतिम सामन्यात के. बबिशला पराभूत केले. गतवर्षीचा उपविजेता थॉकोम बिकी (सव्‍‌र्हिसेस) आणि हर्षराज (बिहार) यांना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.