‘रासप’ला हवा सत्तेत वाटा! महादेव जानकरांची फडणवीसांकडे कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी

मित्र पक्षाला सत्तेत वाटा द्यायचा की नाही, हे आता सरकारने ठरवावं, असे महादेव जानकर म्हणाले आहेत

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली आहे. ‘रासप’चे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

“शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करत आहे. या सरकारने आत्तापर्यंत ५३ जीआर काढले आहेत. सर्व समाजाला आणि शेतकऱ्यांना घेऊन चालणारं हे सरकार आहे”, असे जानकर यावेळी म्हणाले. रासप राष्ट्रीय लोकशाही दलाचा एक भाग आहे. पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, अशी मागणी ‘रासप’चे महाराष्ट्र अध्यक्ष काशीनाथ शेवते आणि महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना केल्याचे यावेळी जानकर यांनी सांगितले. मित्र पक्षाला सत्तेत वाटा द्यायचा की नाही, हे आता सरकारने ठरवावं, असेही ते म्हणाले.

हे वाचले का?  CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांवरही जानकर यांनी भाष्य केलं. मुंडे या भाजपाची एकनिष्ठ राहतील, त्या पक्ष सोडणार नाहीत, असे मत जानकर यांनी व्यक्त केले. प्रत्येक पक्षाला ऊन-सावलीचा सामना करावा लागतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इच्छा पूर्ण करतो, अशी आपली श्रद्धा असल्याचे जानकर म्हणाले. राज्यातील जनतेला सुख, समाधान, समृद्धी लाभावी, यासाठी बाप्पाकडे साकडं घातल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.

हे वाचले का?  माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार