लक्षात ठेवा, पुढच्या दोन-तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल; रावसाहेब दानवेंचा दावा

“सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू”

राज्यातील राजकीय अस्थिरतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हं आहेत. भाजपा राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुढील दोन तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार असेल, असा दावा केला आहे. परभणी येथे एका कार्यक्रमात बोलताना दानवे यांनी हे म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे परभणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दानवे म्हणाले,” कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा,” असं म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : मराठा ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

“राज्यात सरकार कसं स्थापन होईल, हे मी आता सांगणार नाही. मात्र, सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू. आम्ही सध्या फक्त होणाऱ्या निवडणुका पार पडण्याची वाट बघत आहोत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन काम करायचं की, महाराष्ट्रात आपण सरकार स्थापन करणार आहोत,” असं आवाहन दानवे यांनी केलं.

हे वाचले का?  “विशाळगडप्रकरणी मला जबाबदार धरल्याने…”; नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

“पदवीधर निवडणुकीत आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे. भाजपाकडे विधानसभेत बहुमत असलं पाहिजे. या निवडणुकीत तीन पक्ष भाजपाविरूद्ध लढत आहेत. मात्र, त्यांचा एकमेकांवरच विश्वास नाहीये,” अशी टीकाही दानवे यांनी महाविकास आघाडीवर केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपानं शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या घटनेच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच दानवे यांनी भाजपा राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे.