लता मंगेशकरांच्या अस्थींचे रामकुंडात विसर्जन

गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उभारलेल्या अडथळय़ांमुळे भाविकांची गैरसोय

नाशिककरांची मोठी गर्दी; गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी उभारलेल्या अडथळय़ांमुळे भाविकांची गैरसोय

नाशिक : गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे गुरुवारी सकाळी येथे रामकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटूंबातील सदस्य उपस्थित होते. नाशिककरांनी यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच रामकुंडाकडे जाणाऱ्या मार्गावर दोरी बांधून अडथळे उभारल्याने भाविकांची गैरसोय झाली.

लता मंगेशकर यांचे नाशिकशी भावनात्मक संबंध होते. वेगवेगळय़ा कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचे नाशिकला येणे होत असे. मुंबई येथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बहुतांश नाशिककरांना जाता आले नाही. त्यामुळे किमान गोदाकाठावर त्यांच्या अस्थींचे दर्शन घ्यावे, या इच्छेने नाशिककरांनी सकाळपासून गोदाकाठावर गर्दी करण्यास सुरूवात केली होती. गोदाकाठ परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी यावेळी रस्त्यावर रांगोळय़ा काढल्या होत्या. नागरिकांची गर्दी होईल हे लक्षात घेऊन पोलिसांनी रामकुंड परिसरासह गोदाकाठावर मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रामकुंडाकडे जाणाऱ्या मार्गावर दोरी बांधण्यात आली होती. सकाळी मंगेशकर कुटूंबियांचे मुंबईहून विमानाने ओझर येथे आगमन झाले. नंतर रस्तामार्गे त्यांची वाहने रामकुंड परिसरात आली. यावेळी रामकुंडावर पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पं. शांताराम भानोसे यांच्यासह ११ पुरोहितांनी दीड तासांहून अधिक काळ विधीवत अस्थीपूजनासह अन्य विधी केले. मंगेशकर कुटूंबियांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने रामकुंडावर छोटा मंडप उभारण्यात आला होता. अस्थी कलशाच्या विधीवत पूजनास आदिनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. महापालिका आयुक्त  कैलास जाधव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे हेही उपस्थित होते.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

महापौर सतीश कुलकर्णी मुंबईत असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आ. सुहास कांदे आदी स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी इतर पक्षांपेक्षा शिवसेनेचेच पदाधिकारी अधिक प्रमाणावर दिसत होते. अस्थी कलशाच्या दर्शनासाठी नाशिककरांनी रामकुंडाभोवती गर्दी केली होती. अस्थी विसर्जनानंतर मंगेशकर कुटूंबियांनी विश्रामगृहात काही वेळ विश्रांती घेतली.

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल