लळिंग पर्वतरांगेतील ‘रामगड’ किल्ला प्रकाशात

नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांची कामगिरी

साल्हेर, मुल्हेर, हरिहर, गाळणा, लळिंग अशा कितीतरी गडकिल्ल्यांमुळे शिवकालीन इतिहासाचे वैभव आपल्या भाळी मिरविणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या यादीत आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे.

नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी धुळे जिल्ह्य़ातील लळिंग किल्ल्याच्या पर्वतरांगेत असलेला ‘रामगड’ प्रकाशात आणला आहे. विशेष शोधमोहिमेद्वारे त्यांनी धुळे तालुक्यातील सडगाव येथे असणारा रामगड हा केवळ धार्मिक डोंगर नसून त्याची किल्ला ही ओळख उजेडात आणली आहे. या शोधमोहिमेत कु लथे यांच्यासमवेत राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, अविनाश जोशी, मनोज बैरागी हे सहभागी होते.

गिरिभ्रमण आणि गिर्यारोहणात आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या येथील वैनतेय संस्थेचे सुदर्शन कु लथे हे विश्वस्त असून नाशिक जिल्हा गिर्यारोहण संघाचे सचिव म्हणूनही ते काम पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी लळिंग किल्ल्याच्या भटकंती दरम्यान याच पर्वतरांगेत एक धार्मिक डोंगर असून त्यावर पाणी असल्याची माहिती स्थानिकांकडून  कुलथे यांना मिळाली होती. तेव्हापासून या डोंगराविषयी त्यांच्या मनात जिज्ञासा होती. नकाशांचे वाचन, मागील आठवडय़ात प्रत्यक्ष भेट आणि अधिक अभ्यास के ल्यानंतर या डोंगराचे नाव रामगड असून हा किल्ला असल्याचे अधोरेखित करणारा दस्तावेज हाती लागला.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

धुळ्याजवळील लळिंग किल्ल्यापासून पश्चिमेकडे ११ किलोमीटरवर असलेले सडगाव, हेंकळवाडी ही रामगडच्या पायथ्याची गावे आहेत. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मालेगावहून करंजगव्हाण-दहिदी-अंजनाळेमार्गे सडगाव असा मार्ग आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १९६० फूट (५९७ मी.) असून अगदी अर्ध्या तासात गडमाथा गाठता येतो.

रामगडाच्या पायथ्याजवळ तसेच वरती पीराचे स्थान आहे. रामगडावर तीन पाण्याच्या खोदीव टाक्या आहेत. त्यापैकी उत्तरेकडे असलेल्या सुमारे सात फूट खोल असलेल्या टाक्यातील पाणी पिण्याजोगे आहे. गडमाथा आणि परिसरात आपटय़ाची झाडे मोठय़ा प्रमाणावर आहेत. रामगडावरील पाण्याची प्राचीन खोदीव टाकी, माथ्यावरील जोती यावरून हा किल्ला असण्याला पुष्टी मिळते. लळिंग पर्वतरांग पूर्व ते पश्चिम अशी पसरलेली आहे. लळिंग रांगेच्या पूर्व टोकावर लळिंग किल्ला तर पश्चिम टोकावर रामगड आहे. लळिंग आणि गाळणा या किल्ल्यांच्या बरोबर मध्यभागी रामगड येतो. रामगडापासून सरळ रेषेत अंतर मोजल्यास लळिंग १० किलोमीटर तर गाळणा १२ किलोमीटरवर आहे. रामगडाच्या माथ्यावरून लळिंग आणि गाळणा दोन्ही किल्ले नजरेच्या टप्प्यात येतात. त्यामुळे या दोन्ही किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठीचे चौकीचे ठिकाण म्हणून रामगडची बांधणी झाली असण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

रामगडावरून दोन्ही किल्ल्यांवर संदेश देणे, पोहोचविण्याचे कामही होत असावे. रामगडावरील पाण्याची साठवणूक आणि गडमाथ्याचा परीघ पाहता अगदी जुजबी शिबंदी येथे असावी. पहारा देणे आणि चौकी म्हणूनच के वळ या गडाचा वापर होत असावा. रामगडावर सद्य:स्थितीत एकही हिंदू देवतेचे मंदिर, समाधी नाही. तरीही गडाचे नाव रामगड का, हे मात्र समजू शकत नाही. पंचक्रोशीतील विविध गावांतूनही या नावासंदर्भातील इतिहासाविषयी फारशी माहिती हाती लागत नाही. दर गुरुवारी लोक येथे पीराच्या दर्शनासाठी येत असतात. गुरुवार वगळता इतर दिवशी रामगडावर फारसे कोणी फिरकतही नाही.

पोहोचायचे कसे? धुळ्याजवळील लळिंग किल्ल्यापासून पश्चिमेकडे ११ किलोमीटरवर असलेले सडगाव, हेंकळवाडी ही रामगडच्या पायथ्याची गावे आहेत. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मालेगावहून करंजगव्हाण-दहिदी-अंजनाळेमार्गे सडगाव असा मार्ग आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १९६० फूट (५९७ मी.) असून अगदी अर्ध्या तासात गडमाथा गाठता येतो.

टेहळणीसाठी बांधणी?

नाशिकमधील प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि गिर्यारोहक गिरीश टकले यांचे या शोधमोहिमेसाठी मार्गदर्शन लाभले. रामगड हा गिरीदुर्ग असल्याला त्यांनी दुजोरा दिला. फारूखी सुल्तानांनी लळिंग किल्ला वसवला त्या काळात या टेहळणीच्या किल्ल्याची बांधणी केली असावी आणि ब्रिटिशांविरुद्ध बंडाच्या वेळी होळकरांच्या कागदपत्रांत याचा उल्लेख सापडण्याची शक्यता टकले यांनी वर्तवली आहे.

हे वाचले का?  नाशिक : शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन

रामगड हा किल्ला असल्याचे प्रकाशात आणले असले तरी अधिक माहितीसाठी पुन्हा त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. अनेक गड-किल्ले असे आहेत की त्यांची इतिहासात फारशी नोंद आढळत नाही. ऐतिहासिक कागदपत्रांमध्येही त्यांचा उल्लेख आढळत नाही. परंतु, अन्य किल्ल्यांवर जे अवशेष आढळतात, ते येथेही आढळतात.

– सुदर्शन कुलथे, विश्वस्त, वैनतेय गिरिभ्रमण गिर्यारोहण संस्था, नाशिक