लसीकरणाची नोंदणी आता व्हॉट्स अ‍ॅपवर !

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी ही व्यवस्था असून चॅटबोटच्या मदतीने ते साकारण्यात आले आहे.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप या संदेशवहन उपयोजनावर आता करोना प्रतिबंधक लसीकरणाची वेळ घेता येणार आहे, वापरकर्ते त्यांच्या जवळच्या केंद्रात माय गव्ह करोना हेल्पडेस्कच्या मदतीने नाव नोंदवू शकणार आहेत.

५ ऑगस्टला माय गव्ह व व्हॉटसअ‍ॅप यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा चॅटबोटच्या मार्फत दिली होती. ३२ लाख प्रमाणपत्रे त्यावरून डाऊनलोड करण्यात आली आहेत.

मायगव्ह करोना हेल्पडेस्क व्हॉटसअपवर तयार करण्यात आले असून मार्च २०२०  पासून त्यावर करोनाबाबतची खरी माहिती अफवा टाळण्यासाठी दिली जात आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात ते उपयोगी ठरले आहे. ४ कोटी १० लाख वापरकर्त्यांंनी या उपयोजनाचा लाभ घेतला आहे.

हे वाचले का?  ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न! स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

माय गव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यांनी सांगितले की, मायगव्ह करोना हेल्पडेस्क हा क्रांतिकारी मार्ग असून त्यातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. हॅपटिक व टर्न डॉट आयो यांचीही मदत यात घेण्यात आली आहे. आता त्यात लसीकरणासाठी नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय जवळची लसीकरण केंद्रेही शोधता येणार आहेत. त्यात कुठल्या वेळेला लस घ्यायची हेही ठरवता येईल. लसीकरण प्रमाणपत्रेही डाऊनलोड करता येणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी ही व्यवस्था असून चॅटबोटच्या मदतीने ते साकारण्यात आले आहे. देश डिजिटलायझेशनमध्ये सक्षम होत असल्याचे ते निदर्शक आहे.

हे वाचले का?  Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

प्रक्रिया अशी..

मायगव्ह करोना हेल्प डेस्क चॅटबोटशी संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपवर ९१— ९०१३१५१५१५ हा क्रमांक सेव्ह करायचा आहे. त्यातून चॅटबोटच्या मदतीने पुढे जाण्यास मदत होईल व तुम्ही लसीकरणाची नोंदणी करू शकाल. त्यातून एक सहा अंकांचा पासवर्ड तुम्हाला मोबाइलवर येईल त्यानंतर तारीख, वेळ व ठिकाण निवडता येणार आहे त्यासाठी पिनकोड व लशीचा प्रकार यांचा उल्लेख करावा लागणार आहे.