करोना महामारी विरोधातील युद्धात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पडत आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (शनिवार)सुरूवात झाली आहे. जगातील सर्वात मोठा असा हा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक असल्याचे, यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ”मी समस्त देशवासियांना या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छित आहे की, करोना वॅक्सिनचे दोन डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला डोस घेतला व नंतरचा डोस घेणं विसरले, अशी चूक करू नका. जसे की तज्ज्ञं सांगत आहेत, पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिनाचे अंतर ठेवले जाईल. तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे, दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या शरिरात करोनाच्या विरोधात लढण्यासाठीची आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. त्यामुळे लसीकरण होताच तुम्ही बेजबाबदारपणे वागायला लागला, मास्क काढून ठेवलं, सुरक्षित अंतर ठेवणं विसरलात…तर काही उपयोग होणार नाही. मी विनंती करतो की असं करू नका.”
तसेच, मी तुम्हाला आणखी एख गोष्ट अत्यंत आग्रहाने सांगू इच्छित आहे की, ज्या प्रकारे धैर्याने तुम्ही करोनाशी लढलात. तसेच, धैर्य आता लसीकरणाच्यावेळी देखील दाखवायचं आहे. असं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी देशवासियांना केलं.
पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित करणयास सुरूवात केली. “काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी करोना लस मिळेल,” असं मोदी म्हणाले.