लोकसभा निवडणुकीची धामधूम…राज ठाकरे, शरद पवार नाशिक दौऱ्यावर

मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे १३ मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतर्फे जय्यत तयारी सुरु झाली आहे. मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येणारे राज ठाकरे हे शुक्रवारी सकाळी पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात आरती करणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या अधिवेशनात ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राज यांच्या दौऱ्यापाठोपाठ १३ मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी निफाड येथे उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केटमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सत्ताधारी महायुतीने राष्ट्रीय युवा महोत्सव, विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजनाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे दौरे झाले. पंतप्रधान मोदी यांनी श्री काळाराम मंदिरात महाआरती, गोदा पूजनही केले होते. शिवसेना ठाकरे गटाने राज्यस्तरीय अधिवेशनासाठी श्रीराम भूमीची निवड केली होती. मनसेने त्यांचे अनुकरण करत वर्धापन दिन सोहळ्यासाठी नाशिकची निवड केली. राज यांच्या दौऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली जात आहे. गुरुवारी सायंकाळी राज यांचे शहरात आगमन होणार आहे. पाथर्डी फाटा येथे त्यांचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन आहे.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंचवटीतील श्रीकाळाराम मंदिरात ते महाआरती करतील. त्यानंतर दिवसभर पक्षीय कार्यक्रम होतील. शनिवारी सकाळी दादासाहेब गायकवाड सभागृहात मनसेचे अधिवेशन होणार आहे. यावेळी राज हे सर्वांना मार्गदर्शन करतील, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मनसेने शहरात वातावरण निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. ठिकठिकाणी स्वागताचे फलक उभारले जात आहेत.

महायुती तसेच महाविकास आघाडीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. महाविकास आघाडीत नाशिकची जागा आपल्याकडे राहील हे गृहीत धरून शिवसेना ठाकरे गटाने तयार चालवली आहे. महायुतीत तिन्ही पक्षांकडून नाशिकवर दावा केला जात असल्याने घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यात मनसेने या जागेवर लक्ष केंद्रीत केल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मनसेही महायुतीचा भाग होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा कुणाच्या पदरात पडणार, याबद्दल उत्सुकता आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

राष्ट्र्रवादीचा निफाडमध्ये शेतकरी मेळावा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे १३ मार्च रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता एमराल्ड पार्क या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दुपारी तीन वाजता निफाड येथे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीतर्फे सायंकाळी निफाडच्या उगाव रस्त्यावरील नवीन कांदा मार्केट परिसरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पवार यांची जाहीर सभा होईल. कांद्याच्या प्रश्नावर याआधी पवार यांनी चांदवड येथे रास्तारोकोत सहभाग घेतला होता. केंद्र सरकारने सशर्त निर्यात खुली केली असली तरी त्याचा कुठलाही लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही.

हे वाचले का?  Ashok Chavan : ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरुन भाजपा आणि महायुतीतच एकमत नाही? ‘हे’ तीन नेते काय म्हणाले?

द्राक्षाची फारशी वेगळी स्थिती नाही. सोयाबीन, भाजीपाला व अन्य कृषिमालालाही भाव नाही. या एकंदर परिस्थितीत पवार हे शेतकऱ्यांची संवाद साधणार असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी सांगितले. महाविकास आघाडीत दिंडोरीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, पक्षाने या मतदारसंघातील निफाडमधून प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन केले आहे.