दोन दिवसांमध्ये पेट्रोल ४५ पैसे प्रती लीटरने महाग झालंय. २२ दिवसांपासून स्थिर असणारे दर बुधवारपासून पुन्हा वाढवण्यास सुरुवात झालीय.
देशभरामध्ये गुरुवारी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी इंधनदरवाढ करण्यात आलीय. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २५ पैसे प्रती लीटरने वाढवण्यात आले असल्याने कालपर्यंत १०१.३९ रुपयांना मिळणारं पेट्रोल आज १०१.६४ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये ३० पैसे प्रती लीटरने वाढ करण्यात आलीय. कालच्या ८९.५७ रुपये प्रती लीटरवरुन आज डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रती लीटरवर पोहचले आहेत. इंडियन ऑइल कॉर्परेशनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०७.७१ रुपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ९७.५२ रुपये प्रती लीटरपर्यंत पोहचले आहेत.
देशातील चार प्रमुख महानगरांपैकी मुंबईमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. राज्यांमध्ये तेथील स्थानिक सरकारकडून म्हणजेच राज्य सरकारांकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे इंधनाच्या दरांमध्ये तफावत जाणवते. मागील सहा दिवसांमध्ये डिझेलचा दर प्रती लीटरमागे १ रुपया २५ पैशांनी वाढलेत.
भारतीय तेल कंपन्यांनी २४ सप्टेंबर रोजी २० पैशांनी, २६ सप्टेंबर रोजी २५ पैशांनी डिझेलचे दर वाढवले होते. तर २७ सप्टेंबर रोजीही डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवण्यात आलेले. काल पुन्हा एकदा २५ पैशांनी दरवाढ करण्यात आली तर आज लीटर मागे ३० पैशांनी दरवाढ झालीय. पेट्रोलचे दर मागील २२ दिवसांपासून स्थीर होते मात्र आता ते सुद्धा कालपासून वाढवण्यात आलेत. दोन दिवसांमध्ये पेट्रोल ४५ पैसे प्रती लीटरने महाग झालंय.
चार मुख्य शहरांमधील पेट्रोल डिझेलचे प्रति लिटर दर खालीलप्रमाणे : –
दिल्ली – पेट्रोल १०१.६४ रुपये, डिझेल ८९.८७ रुपये (प्रती लीटरचा दर)
मुंबई – पेट्रोल १०७.७१ रुपये, डिझेल ९७.५२ रुपये (प्रती लीटरचा दर)
चेन्नई- पेट्रोल ९९.३६ रुपये, डिझेल ९४.४५ रुपये (प्रती लीटरचा दर)
कोलकाता – पेट्रोल १०२.१७ रुपये, डिझेल ९२.९७ रुपये (प्रती लीटरचा दर)
जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.