वाढीव वीज देयकांचा वाद टाळण्यासाठी ‘महावितरण’ची धडपड

मीटरची नोंद स्वत: पाठवणारे २२ हजार ग्राहक

नाशिक : करोनाच्या र्निबधात ग्राहकांनी स्वत:हून मीटरची नोंद पाठवावी यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. त्या अंतर्गत एप्रिल महिन्यात नाशिक परिमंडलातील २२,३३० वीजग्राहकांनी भ्रमणध्वनी अ‍ॅप, संकेतस्थळ व एसएमएसद्वारे मीटरची नोंद महावितरणकडे पाठविली. मागील टाळेबंदीनंतर वाढीव वीज देयकांचा विषय बराच गाजला होता. यावेळी पुन्हा तशा तक्रारी होऊ नयेत म्हणून वीज कंपनी दक्षता घेत आहे. ग्राहकांनी स्वत: नोंद पाठविली, देयकावर तिची तपासणी केल्यास साशंकता संपुष्टात येईल. या उपक्रमास परिमंडलातील ग्राहक संख्या पाहता प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर, र्निबध लागू आहेत. रुग्ण आढळलेले क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत दर महिन्याला वीज मीटरची नोंद घेण्यात मागील टाळेबंदीप्रमाणे अडचणी येतील हे लक्षात घेऊन महावितरणने ग्राहकांना स्वत:हून मीटर नोंद पाठविण्याची सोय उपलब्ध केली.

ग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबत मीटर नोंद पाठविण्याची मूदत देखील चार दिवस करण्यात आली आहे. सध्याच्या आपत्कालिन परिस्थितीत आत भ्रमणध्वनी लघूसंदेशद्वारे नोंद पाठविण्याची खास सोय करण्यात आली. एरवी वीज कंपनी प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघु दाब वीज जोडणीच्या मीटरची छायाचित्र नोंद घेते. ग्राहकांना मीटर नोंदीच्या दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवस आधी नोंद लघुसंदेशाद्वारे पाठविण्याची पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हापासून ग्राहकांना स्वत:हून आपल्या मीटरची नोंद लघूसंदेश, भ्रमणध्वनी अ‍ॅप, संकेतस्थळावर पाठविता येत आहे.

मार्चच्या तुलनेत स्वत: नोंद पाठविणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. नाशिक परिमंडलातील २२ हजार ३३० ग्राहकांनी मीटर नोंद पाठविली. मागील टाळेबंदीचा अनुभव लक्षात घेऊन ही सुविधा देण्यात आली आहे.

टाळेबंदीत सरासरी देयके पाठविली गेली. नंतर जेव्हा वीज मीटरच्या प्रत्यक्ष नोंदी घेतल्या गेल्या तेव्हा देयकांमध्ये कमालीची वाढ झाल्याची ग्राहकांच्या तक्रारी आल्या. राजकीय पातळीवर हा विषय बराच गाजला. आंदोलने झाली. यंदा पुन्हा तसे काही घडू नये असा महावितरणचा प्रयत्न आहे.

नोंदणीनुसार देयकाची खात्री

वीज ग्राहकांनी स्वत:हून नोंद पाठविल्यास मीटर व नोंदणीकडे नियमित लक्ष राहील. वीज वापरावर देखील नियंत्रण राहील. नोंदणीनुसार देयक आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तक्रार करता येईल. वीज देयकांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. नोंदणी अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. नोंदणी पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यासह विविध फायद्यामुळे वीज ग्राहकांनी दरमहा मीटर नोंद पाठवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.