वादळी पावसाचा पाच तालुक्यांना फटका; ९३ घरांची पडझड, १७ कांदाचाळींसह शेडनेट, केळीबागेचे नुकसान; वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी राहिली. गुरुवारी वादळी पावसाचा पाच तालुक्यांना फटका बसला.

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी राहिली. गुरुवारी वादळी पावसाचा पाच तालुक्यांना फटका बसला. ९३ कच्च्या घरांची पडझड झाली. तसेच १७ कांदा चाळ, दोन कुक्कुटपालन केंद्रे, तीन शेडनेटचे नुकसान झाले. वीज पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. सिन्नर तालुक्यातील नळवाडीची महिला संगमनेरमध्ये गेली होती. तिथे वीज कोसळून तिचा मृत्यू झाला.

  जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, चांदवड, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे गुरुवारी जोरदार आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही काही भागात विजांच्या कडकडाटासह त्याने हजेरी लावली. दुपारी शहर परिसरात अर्धा ते पाऊण तास अकस्मात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. परंतु, त्याच वेळी पंचवटीसह इतर भागात मात्र सायंकाळपर्यंत पाऊस गर्जत राहिला. परंतु, तो कोसळला नाही. शहरासह ग्रामीण भागात पावसामुळे विजेचा लपंडाव दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत राहिल्याने उकाडय़ाने नागरिक हैराण झाले.  गुरुवारी पावसाने पाच तालुक्यांत नुकसान झाले. त्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मौजे संसरी येथे अंगावर वीज पडून सविता गोडसे यांचा मृत्यू झाला. सिन्नरच्या नळवाडी येथील सुरेखा मधे यांचा संगमनेरमध्ये वीज पडून मृत्यू झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वादळी पावसात दोन दुधाळ पशुधन, तीन ओढकाम करणारी लहान-मोठी जनावरे मयत झाली.

हे वाचले का?  नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, गोदावरीचा पूर ओसरला….; जायकवाडीला साडेदहा टीएमसी पाणी

पाच तालुक्यांत एकूण ९३ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. चांदवडमधील सात, नांदगावमधील सहा आणि मालेगाव तालुक्यातील चार अशा एकूण १७ कांदा चाळींचे नुकसान झाले. नांदगाव तालुक्यातील दोन कुक्कुटपालन केंद्रांनाही पावसाची झळ बसली. मालेगाव तालुक्यात तीन ठिकाणी शेडनेटचे नुकसान झाले. तीन शाळांचे पत्रे उडाले. प्रत्येकी एक दुकान, लॉन्स, टपरीचेही नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हे वाचले का?  सायबर गुन्हेगारीत वाढ, सहा महिन्यात १५ कोटीहून अधिक रक्कम लंपास

नांदगावात केळीच्या बागा उदध्वस्त 

नांदगाव तालुक्यातील बिरोळे  शिवारात मान्सूनपूर्व पावसाने विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह धुडगूस घालत शेतकरी शंकरसिंग सोळुंखे यांची सात एकर केळीची बाग भुईसपाट केली. तब्बल आठ हजार केळीचे खोड या पावसात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घड तयार होऊन ते काढणीला आलेले असतानाच निसर्गाने घाला घातला. जून २०२१ मध्ये  सोळुंखे यांनी केळी पिकांची लागवड केली होती. १० महिन्यांहून अधिक काळ  बाग जपली. बाग तयार होऊन उत्पादन हाताशी आले होते. बाजारात माल विक्री होऊन हातात पैसे येतील म्हणून शेतकरी आनंदात असतानाच मान्सूनपूर्व पावसाने एका तासात होत्याचे नव्हते केले. लाखो रुपयांच्या हाताशी आलेल्या उत्पादनावर पाणी फिरले. बोराळे गावातील बभुतसिंग देवरे आणि नाना देवरे यांच्या कांद्याच्या चाळी देखील उद्ध्वस्त झाल्या. कांदा चाळीचे छप्पर उडाल्याने चाळीत साठवलेला कांदा भिजून सडू लागला आहे. नुकसानीनंतर शासकीय यंत्रणा बांधावर आल्या, नुकसानीची पाहणी करत पंचनामे करण्यात आले.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री