करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम आहेत.
साहित्य संमेलनाच्या जमा निधीतून साडेसात लाखांची मुदत ठेव
नाशिक : करोनाचा प्रसार ओसरल्यानंतर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे घेण्यास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने अनुकूलता दर्शविल्यामुळे संयोजकांनी आता वादाचे कुठलेही मुद्दे उपस्थित होऊ नये म्हणून आयोजनात पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महामंडळातील पदाधिकाऱ्यांशी औरंगाबाद येथे सकारात्मक बैठक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संयोजकांनी संमेलनाच्या उत्पन्न व खर्चाचे पत्रक प्रसिध्द केले. त्यानुसार संमेलनासाठी विविध माध्यमातून १५ लाख १६ हजार २६२ रुपये प्राप्त झाले. यातील साडेसात लाख रुपये दोन बँकांमध्ये मुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवण्यात आले. त्याच्या व्याजातून उत्पन्नात भर पडत आहे.
करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कायम आहेत. या परिस्थितीत मराठी साहित्य संमेलनावर दाटलेले अनिश्चिततेचे मळभ साहित्य महामंडळ आणि स्वागत समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दूर झाले.
करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर संमेलनाची तारीख निश्चित केली जाणार आहे. संमेलनाच्या कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या अंदाजपत्रकावर बरेच विवाद झाले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी त्यावर ताशेरे ओढल्यानंतर निमंत्रक संस्थेने आजवरच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील सार्वजनिक करण्यास सुरूवात केली. दर महिन्याला हा खर्च नियमितपणे सादर केला जात आहे. गेल्या महिनाभरात फारशा घडामोडी घडल्या नसल्याने उत्पन्न -खर्चाच्या पत्रकात फारसे बदल झालेले नाहीत. ३१ जुलैपर्यंतच्या उत्पन्न व खर्चाचे पत्रक लोकहितवादी मंडळाने दिले आहे. ग्रंथ प्रदर्शनातील १२१ कक्षांची नोंदणी झाली. त्यापोटी ८३०४४० रुपये प्राप्त झाले.
२९ प्रतिनिधींच्या शुल्कापोटी ८७०००, देणगी स्वरूपात १५३०००, स्वागत समिती सदस्य शुल्क (५० व्यक्तींचे) २६४५०१, समिती सदस्य शुल्क (२८७ व्यक्ती) १३३५००, सामान्य देणगीपोटी ३३००, निविदा शुल्क ३८५००, ठेवीवरील व्याज ६०२१ या पोटी संयोजकांना एकूण १५ लाख १६ हजार २६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मार्चमध्ये संमेलन स्थगित झाल्यामुळे आजवर ५२ ग्रंथ विक्रेत्यांनी नोंदणी रद्द केली. त्यांना ३६३७४० रुपये परत द्यावे लागले. १५ जणांना प्रतिनिधी शुल्काचे ४५ हजार रुपये परत द्यावे लागले. छपाई व स्टेशनरीवर ५६२१५, सभा खर्च (चहा, पाणी व भोजन) ३२८४२, प्रवासावर ३१२०५, पगार ८५०००, महामंडळ पदाधिकारी स्थळ निश्चित समिती ६८०१६, संगणक देखभाल २५००, टपाल २९६, बँक शुल्क ६८८ असा खर्च झाला आहे. या शिवाय ५०६४३४ रुपये नामको बँकेत तर २५१३८७ रुपये विश्वास बँकेत ठेवीपोटी ठेवण्यात आले आहेत. नामको बँकेत ३४००९ आणि विश्वास बँकेत ३८९३० रुपये शिल्लक आहेत.
संमेलनाच्या आयोजनात वेगवेगळ्या कारणास्तव वाद उद्भवत आहेत. संमेलनासाठी दोन बँकांमध्ये खाते उघडण्यास महामंडळाने आक्षेप घेतला होता. संमेलनास चार ते पाच कोटीच्या आसपास खर्च येणार असल्याचे सांगितले जात होते. संमेलनाच्या उत्तरोत्तर वाढलेल्या अंदाजपत्रकावर महामंडळाने ताशेरे ओढले होते.
संमेलनास आमदार निधीतून पैसे घेण्यावर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली होती. अखेरीस स्वागताध्यक्षांसह निमंत्रक संस्थेने महामंडळाच्या अटी-शर्तीनुसार संमेलनाचे आयोजन केले जाईल, हे मान्य करावे लागले. आमदार निधी ऐवजी लोकसहभागातून निधी उभारण्याची तयारी दर्शवावी लागली. त्यामुळे उत्पन्न-खर्चाची माहिती देत आयोजनात पारदर्शकता राखण्याची धडपड केली जात आहे.