मकरसंक्रांतीच्या दिवशी वारा अतिशय मंद असल्याने पतंग आकाशात पाठविताना पतंगप्रेमींची चांगलीच दमछाक झाली.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : मकरसंक्रांतीच्या दिवशी वारा अतिशय मंद असल्याने पतंग आकाशात पाठविताना पतंगप्रेमींची चांगलीच दमछाक झाली. मध्येच वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर संचारणारा उत्साह वारा थांबताच अंतर्धान पावत होता. अशा वातावरणातही आकाशात विविधरंगी पतंगांची गर्दी झाली. सर्वत्र ‘गै बोलो रे धिन्ना.’ चा घोष दुमदुमत होता. काटलेला पतंग पकडण्यासाठी लहानग्यांची होणारी धावपळ चिंता वाढविणारी ठरली. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, वापर होत आहे काय, यावर पोलिसांची नजर होती.
मकरसंक्रांत म्हणजे पतंगोत्सव. त्याचा लहानग्यांसह आबालवृद्धांनी मनमुराद आनंद घेतला. पतंगोत्सवाच्या उत्साहात अंतर्धान पावणाऱ्या वाऱ्यामुळे विरजण पडले. पतंग, मांजा खरेदीसाठी दुपापर्यंत गर्दी कायम होती. बाजारपेठेत विविध आकाराच्या पतंगांची खरेदी झाली. परंतु, आकाराने मोठे असणारे पतंग पुरेशा वाऱ्याअभावी आकाशात पाठवणे जिकिरीचे ठरले.
सकाळी काही अंशी वारा होता. पण तो अधूनमधून गायब होत होता. दुपारनंतरही परिस्थिती फारशी बदलली नाही. सकाळपासून मुले इमारतीच्या गच्चीवर, खुल्या मैदानात पोहोचली. पतंग उडविण्याची त्यांनी धडपड केली. वाऱ्याअभावी पतंग आकाशात पाठविणे दिव्य होऊन बसले. वारा नसताना पतंग उडविणे अवघड असते. अधूनमधून वारा येत होता. वाऱ्याचा वेग थोडाफार वाढला तरी पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचत होता. मध्यवर्ती भागातील वाडे आणि काही इमारतींवर खास ढोल अथवा टेपवर गाण्याची व्यवस्था करण्यात आली. काही कुटुंबीयांनी दिवसभर गच्चीवर थांबण्यासाठी भोजन व्यवस्था केली. पुरेसा वारा नसताना हेलकावे खाणाऱ्या विविधरंगी पतंगांनी आकाश भरून गेले. परस्परांच्या पतंगी काटण्याची स्पर्धा लागली. सायंकाळी उशिरापर्यंत ही रणधुमाळी सुरू होती.
नायलॉन मांजामुळे शहरात आधीच दुर्घटना घडल्या आहेत. पंधरवाडय़ापूर्वी पंचवटीतील महिलेचा नायलॉन मांजा गळ्यात अडकून मृत्यू झाला. नायलॉन मांजामुळे अनेक वाहनधारक जखमी झाले. या मांजाची विक्री, वापरावर र्निबध होते. पोलिसांनी बेकायदेशीपणे त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचे सत्र राबविले. मकरसंक्रातीच्या दिवशी त्याचा वापर होऊ नये म्हणून खबरदारी घेतली गेली. पतंगोत्सवात पांडा, बरेली, फरिदबेग, सहा तारी, नऊ तारी अशा मांजाचा वापर झाल्याचे सांगण्यात आले.पतंग पकडण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात मुलांची धावपळ सुरू होती. पतंगांच्या मागे पळताना मुलांना कोणतेही भान नव्हते.
येवल्यात उत्साह
येवल्याचा पतंगोत्सव प्रसिद्ध आहे. येवला हे पतंगबाजाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याचे प्रत्यंतर मकरसंक्रातीच्या दिवशी आले. वारा कमी असल्याने पतंगप्रेमींचा काहीसा हिरमोड झाला. पतंग उडविण्याचा आबालवृद्धांसह बच्चे कंपनीने आनंद घेतला. युवती, महिलाही मागे नव्हत्या. अपेक्षित वाऱ्याची प्रतीक्षा करताना दमछाक झाली. येवल्याचा पतंगोत्सव तीन दिवस चालतो. त्याचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावहून नागरिक येतात. अपेक्षित वारा नसल्याने दुपारी अनेकांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली.