वाळूमाफियांची मुजोरी! तहसीलदारांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न; नऊ जणांविरुद्ध गुन्हा, तिघे ताब्यात

जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून आता शासकीय अधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

जळगाव: जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून आता शासकीय अधिकार्‍यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. रावेर तालुक्यात नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील परिविक्षाधीन तहसीलदारांवर वाळूमाफियांकडून जेसीबी घालून चिरडण्याचा प्रयत्न झाला, तर मंडळ अधिकार्‍यास धक्काबुक्की करीत धावत्या ट्रॅक्टरवरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रावेर तालुक्यातील पातोंडी शिवारातील भोकर नदीपात्रातून अवैध वाळूचे उत्खनन होत असल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्याअनुषंगाने परिविक्षाधीन तहसीलदार मयूर कळसे यांच्यासह मंडळ अधिकारी जनार्दन भंगाळे, यासीन तडवी, विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर, कोतवाल प्रवीण धनके आदींचे पथक कारवाई करण्यासाठी पातोंडी शिवारातील भोकर नदीपात्रात उतरले. तेथे वाहने जप्तीची कारवाई सुरू करीत सर्व वाहने तहसील कार्यालयात आणण्याच्या सूचना वाळूमाफियांना केल्या. तेथे अवैध गौण खनिजाचा उपसा व वाहतूक करणारा जेसीबी तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीसह व विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असताना आढळून आले.

शासकीय अधिकार्‍यांना पाहून वाळूमाफिया चांगलेच संतापले आणि जप्तीची कारवाई सुरू असताना मोहन बोरसे याने जेसीबी सुरू करीत कळसे यांच्या अंगावर आणला. मात्र, ते सतर्क होऊन बाजूला झाल्याने अनर्थ टळला. मोहन बोरसे हा जेसीबी घेऊन पसार झाला, तर एकजण ट्रॅक्टर ट्रॉलीसह घेऊन पुनखेड्याच्या दिशेने पसार झाला. मनोज बोरसे याने वाळूचे विनाक्रमांकाचे ट्रॅक्टर खिरवडच्या दिशेने घेऊन पळ काढला. विठोबा पाटील यांनी त्यांची गाडी आडवी लावून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो न थांबता त्यांच्या वाहनाला धक्का देत पसार होत असताना ट्रॅक्टरवर बसलेले गजेंद्र शेलकर यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने धक्काबुक्की करून त्यांचा चष्मा फोडत नुकसान करून भ्रमणध्वनी संचही फेकून देत ट्रॅक्टरवरून खाली ढकलून पसार झाला. परिविक्षाधीन तहसीलदार कळसे यांनी दिलेल्या फियादीवरून रावेर येथील पोलीस ठाण्यात मोहन बोरसे, मनोज बोरसे (रा. पातोंडी) यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी श्याम पाटील (२७), कल्पेश धनगर (२७), सुनील धनगर (४४, सर्व रा. पातोंडी) यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील गिरणा, तापी, बोरी, पूर्णा, वाघूर, अंजनी, पांझरा यांसह छोट्या-मोठ्या नदीपात्रातून वाळू उत्खनन सर्रासपणे सुरू आहे. वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज हजारो ब्रास वाळूची तस्करी होत आहे. रात्रीच वाळू वाहतूक होत असल्याचे पाहायला मिळते. त्यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो. आता अवैध वाळू वाहतुकीविरोधातील या कारवाईवरून जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. आता थेट महसूल विभागाच्या पथकातील अधिकार्‍यांच्या जीवावर उठल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस व महसूल यंत्रणा बोटचेपी भूमिका घेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.