नाशिक-पुणे या औद्योगिक शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती रेल्वचा विषय रखडला आहे
नाशिक : सर्व अनुकूल स्थिती असूनही नाशिकचे अर्थकारण काही विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित राहिले. हवाई नकाशावर आलेल्या नाशिकची माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र असणाऱ्या देशातील प्रमुख शहरांशी अद्याप थेट जोडणी बाकी आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनधारकांना कित्येक तास कोंडीत अडकून पडावे लागते. नाशिक-पुणे या औद्योगिक शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती रेल्वचा विषय रखडला आहे.
नाशिक शहरात जलद सार्वजनिक वाहतुकीसाठी मांडलेली, देशातील महानगरांपेक्षा वेगळ्या धाटणीची मेट्रो निओची संकल्पना अंतिम मंजुरीअभावी पुढे सरकली नाही. नाशिकच्या अर्थकारणावर कृषी, धार्मिक पर्यटन, उद्योग व्यवसायाचा प्रभाव आहे. वाराणसीतील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदा आरतीला सुरुवात झाली. धार्मिक आणि वाइन पर्यटनाला बराच वाव असताना स्थानिक पातळीवर पायाभूत सुविधांचा अभाव, दळणवळण व्यवस्थेतील अडचणी प्रकर्षाने समोर येतात. नाशिक जिल्ह्याचे १,५३,१९८ कोटींवर असणारे उत्पन्न प्रशासनाने २०२७-२८ पर्यंत ३,९२,३५१ कोटी रुपयांवर नेण्याचे ध्येय निश्चित केले आहे. एअरबसच्या ताफ्यातील ए-३२० विमानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) देखभाल-दुरुस्ती केंद्र उभारत आहे. कांदा व द्राक्ष निर्यात ग्रामीण अर्थचक्रात महत्त्वाचे ठरतात. शहर, परिसरात वाहतुकीची साधने मर्यादित आहेत.
दळणवळण व्यवस्था महत्त्वाची का?
जिल्ह्यात २२ हजार ८६० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. मुंबई-नाशिक या चारपदरी महामार्गावरील प्रवास भिवंडीतील वाहतूक कोंडीमुळे जिकिरीचा ठरतो. रखडलेल्या पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पात मार्ग बदलाचा विचार सुरू आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी नाशिक जोडले गेले आहे. प्रस्तावित सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी चार तालुक्यांत भूसंपादनाची तयारी सुरू आहे. नाशिक हे दिल्ली, हैदराबाद, नागपूर, इंदूर, गोवा, अहमदाबाद या शहरांशी थेट विमान सेवेने जोडले गेले आहे. बंगळूरु व अन्य प्रमुख शहरांशी थेट विमान सेवा झाल्यास माहिती तंत्रज्ञानसह अन्य उद्याोगांत गुंतवणूक वाढेल, वाहतूक व्यवस्था व रस्त्यांचे व्यापक जाळे कृषी व उद्याोग क्षेत्राच्या विकासाला हातभार लावणार आहे.