विकासदर सहा टक्क्यांखाली; भारताबाबत ‘आयएमएफ’चा अंदाज, मात्र अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सर्वाधिक

२०२४-२५ या आगामी आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही जानेवारीत वर्तवलेल्या ६.८ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे.

वॉशिंग्टन : २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर २० आधार बिंदूंनी कमी होऊन ५.९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा धोक्याचा इशारा देणारा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी आयएमएफने विकासदर ६.१ टक्के राहण्याचे भाकीत केले होते. तथापि, खालावलेल्या या सुधारित अंदाजानंतरही भारतच जगातील सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास साधणारा देश असेल, असे आयएमएफने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन दर्शविणाऱ्या अहवालाने, जागतिक अर्थवृद्धीही २०२३ सालात २.९ टक्क्यांवरून, २.८ टक्क्यांवर येण्याचे सुधारित अनुमान पुढे आणले आहे, जे २०२२ मधील ३.४ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल अर्धा टक्क्यांची घसरण दर्शविणारे आहे. भारताच्या दृष्टीने सरलेल्या आर्थिक वर्षांतील ६.८ टक्क्यांच्या तुलनेत विद्यमान आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था वाढीचा दर ५.९ टक्के असेल. २०२४-२५ या आगामी आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही जानेवारीत वर्तवलेल्या ६.८ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

भारतानंतर चीनचा विकासवेग सर्वाधिक राहिल, असे या अहवालाची आकडेवारी दर्शविते. चीनचा विकासदर २०२३ मध्ये ५.२ टक्के आणि २०२४ मध्ये ४.५ टक्के राहण्याचा अंदाज अहवालाने वर्तविला आहे. जो २०२२ मध्ये केवळ ३ टक्के नोंदवला गेला होता.

जागतिक पातळीवर करोनाची महासाथ आणि त्यानंतर युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर, महागाईला प्रतिबंध म्हणून व्याजदर वाढीमुळे आर्थिक अरिष्ट ओढवण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतून जागतिक पातळीवर उभारीच्या दिशेने मार्गक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जागतिक अर्थवृद्धीला प्रभावित करणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेने जोरदार पुनरागमन केले आहे. पुरवठा-साखळीतील व्यत्यय कमी होत आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ पीएरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी सांगितले.

गौरींचास यांच्या मते, या वर्षीची आर्थिक मंदी प्रगत अर्थव्यवस्थांवर केंद्रीत आहे. विशेषत: युरोपीय संघ आणि अन्य युरोपीय देशांमधील विकासदर अनुक्रमे १.४ आणि १ टक्क्यांपर्यंत वाढण्याआधी तो चालू आर्थिक वर्षांत ०.८ टक्के आणि उणे ०.३ टक्के होण्याची घसरण्याची चिन्हे आहेत. याउलट, उभरत्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थांची स्थिती चांगली राहण्याची शक्यता असून, चालू वर्षांअखेर त्या ४.५ टक्के दराने विकास साधताना दिसू शकतील.

हे वाचले का?  Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

महागाई नियंत्रणासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी समन्वयाने आणि एकसाथ केलेल्या व्याजदर वाढीमुळे स्थिती उत्तरोत्तर नियंत्रणात येत आहे. महागाई निश्चित लक्ष्याकडे परत येण्याबरोबर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. आयएमएफच्या ताज्या अंदाजानुसार, २०२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ३ टक्के विकासदर गाठण्याआधी तो चालू वर्षांत २.८ टक्क्यांपर्यंत खाली येईल. तसेच जागतिक महागाई दर २०२२ मधील ८.७ टक्क्यांवरून, ७ टक्क्यांपर्यंत कमी होईल. २०२४ मध्ये तो ४.९ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा गौरींचास यांनी सकारात्मक अंदाज वर्तविला.

हे वाचले का?  “झारखंडमध्ये घुसखोरीला प्रोत्साहन!”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्ताधारी ‘जेएमएम’वर आरोप

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजाला छेद

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविलेला ५.९ टक्के वाढीचा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजापेक्षा कमी आहे. २०२२-२३ मध्ये ७ टक्के वाढ आणि चालू आर्थिक वर्षांत विकासदर ६.४ टक्के राहील, असे मध्यवर्ती बँकेचे भाकीत आहे. केंद्र सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील जीडीपी वाढीची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.