संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरणाद्वारे राष्ट्रार्पण करण्यात आले.
पीटीआय, कोची (केरळ) : संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी जलावतरणाद्वारे राष्ट्रार्पण करण्यात आले. यामुळे अशा युद्धनौका निर्मितीची क्षमता असलेल्या मोजक्या राष्ट्रांत भारताचा समावेश झाला आहे. ‘‘विक्रांत हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील अतुलनीय ‘अमृत’ आहे,’’ अशा शब्दांत मोदी यांनी या युद्धनौकेचे वर्णन केले.
या निमित्ताने मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेने प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या नव्या चिन्हांकित नौदल ध्वजाचे अनावरणही केले. ‘‘देशाने आज गुलामीचे प्रतीक असलेल्या एका चिन्हाला बदलून गुलामीचे ओझे झुगारले आहे,’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. कोचीच्या ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’मध्ये (सीएसएल) हा सोहळा झाला. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारी नौदलाची पूर्वीची युद्धनौका ‘विक्रांत’ हिचे नाव या नव्या युद्धनौकेस देण्यात आले आहे.
‘आयएनएस विक्रांत’ला छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करीत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले, ‘‘आजचा दिवस ऐतिहासिक आहे. इतिहास बदलण्याचे काम आज झाले असून, भारताने गुलामीच्या एका चिन्हाला बदलून गुलामीचे ओझेच झुगारून दिले आहे. आजपासून भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला आहे. जुन्या ध्वजावर आतापर्यंत गुलामगिरीचे चिन्ह होते. पण आजपासून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने नौदलाचा नवा ध्वज समुद्रावर आणि आकाशात डौलाने फडकणार आहे.’’ नवे नौदल चिन्ह समृद्ध भारतीय सागरी वारशानुसार बनवण्यात येणार असल्याची घोषणा नौदलाने यापूर्वीच केली होती.
नव्या युद्धनौकेच्या वैशिष्टय़ांबाबत मोदी म्हणाले, की हे पाण्यावर तरंगणारे जणू एक शहर आणि हवाईतळ आहे. ‘आयएनएस विक्रांत’वर निर्माण होणाऱ्या विजेमुळे सुमारे पाच हजार घरांची गरज भागू शकेल. विक्रांत नौदल ताफ्यात सामील झाल्याने स्वदेशी विमानवाहू युद्धनौकांच्या निर्मितीची क्षमता असलेल्या अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि फ्रान्ससारख्या देशांच्या निवडक गटांत भारताचा समावेश झाला.
संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनण्याच्या कटिबद्धतेचे ‘विक्रांत’ हे एक उदाहरण असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की अशा युद्धनौकांची निर्मिती करणाऱ्या मोजक्या देशांत भारताचा समावेश झाल्याने एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ‘विक्रांत’ विशाल, विराट, विहंगम, वैशिष्टय़पूर्ण आणि विशेष आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.
‘विक्रांत’ ही केवळ युद्धनौका नाही, तर २१ व्या शतकात भारताच्या परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि संकल्पाचे प्रतीक आहे. जर लक्ष्य दूर असेल, प्रवास क्षितिजापर्यंत असेल आणि आव्हाने अनंत असतील, तर त्यावर भारताचे उत्तर ‘विक्रांत’ असेल. हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील अतुलनीय ‘अमृत’ आहे. यात भारताच्या स्वावलंबित्वाचे प्रतिबिंब दिसते, असेही मोदींनी नमूद केले.
मोदींनी नौदल, कोचीन जहाजबांधणी विभागाचे अभियंते, शास्त्रज्ञ आणि विशेषत: प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांच्या योगदानाची दखल घेत त्यास दाद दिली. ते म्हणाले, की ओणमच्या आनंदी आणि मंगल प्रसंगाच्या आनंदात या सोहळय़ाने भर पडली आहे.
महिलाशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी म्हणाले, की जेव्हा ‘विक्रांत’ आपल्या सागरी हद्दींचे रक्षण करण्यासाठी उतरेल, तेव्हा अनेक महिला नौसैनिकही त्यावर तैनात असतील. अथांग सागराप्रमाणेच अथांग महिलाशक्ती नव्या भारताची ओळख बनत आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राचे अनुसरण करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. ते म्हणाले, थेंब थेंब पाणी हे अथांग समुद्र बनवते. तसेच भारतातील प्रत्येक नागरिकाने ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र अमलात आणण्यास सुरुवात केली, तर देश स्वावलंबी व्हायला वेळ लागणार नाही.
हिंदू-प्रशांत महासागरीय प्रदेश आणि हिंदू महासागरातील सुरक्षेच्या प्रश्नांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले. परंतु आता या प्रदेशास आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्राधान्यक्रम दिला जात आहे. म्हणूनच नौदलासाठी निधीपासून क्षमतावृद्धीपर्यंत आम्ही प्रत्येक क्षेत्रात काम करत आहोत, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्यासह, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनराई विजयन, जहाजबांधणीमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही या वेळी उपस्थित होते.
वैशिष्टय़े काय?
- पहिली देशी विमानवाहू युद्धनौका. विक्रांत २६२ मीटर लांब आणि ६२ मीटर रुंद.
- ताशी २८ सागरी मैल वेगाने साडेसात हजार सागरी मैल अंतर पार करण्याची क्षमता.
- वीस हजार कोटी खर्च, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज.
- ‘अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर’ (एएलएच), ‘मिग २९’ लढाऊ विमानांसह ३० विमानांना वाहून नेण्याची क्षमता.
नवचिन्हांकित नौदल ध्वज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टकोनी राजमुद्रेकडून प्रेरित होऊन तयार करण्यात आलेल्या नवचिन्हांकित नौदल ध्वजाचे अनावरणही मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘‘देशाने आज गुलामीचे प्रतीक असलेल्या एका चिन्हाला बदलून गुलामीचे ओझे झुगारले आहे,’’ अशा शब्दांत मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी शक्तीच्या बळावर असे आरमार उभारले, की त्यामुळे शत्रूची झोप उडाली होती, असे गौरवोद्गारही मोदींनी काढले. ते म्हणाले, की इंग्रज भारतात आले तेव्हा त्यांना भारतीय जहाजांची ताकद आणि त्याद्वारे होणारा व्यापाराचा धाक त्यांना वाटत होता. त्यामुळे त्यांनी भारताच्या सागरी सामर्थ्यांला क्षीण करण्याचा चंग बांधला ठरवले. तत्कालीन ब्रिटिश संसदेत कायदा करून भारतीय जहाजे आणि व्यापाऱ्यांवर कठोर निर्बंध लादले गेले, याचा इतिहास साक्षीदार आहे.
जर लक्ष्य दूर असेल, प्रवास क्षितिजापर्यंत असेल आणि आव्हाने अनंत असतील, तर त्यावर भारताचे उत्तर ‘विक्रांत’ हे असेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील हे अतुलनीय ‘अमृत’ आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान