विठ्ठल मंदिराला दान मिळालेले दागिने वितळविणार

येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मातेस भक्तांकडून देणगीच्या स्वरूपात आलेले सोन्या-चांदीचे अलंकार वस्तू वितळवल्या जाणार आहेत.

वीस किलो सोन्यासह सव्वाचारशे किलो चांदीच्या वस्तुंचा समावेश

श्री विठ्ठल व रुख्मिणी मातेस सन १९८५ ते २०१९ या कालावधीमध्ये भाविकांकडून मोठय़ा प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि अन्य चिजवस्तू दान करण्यात आलेल्या आहेत. यातील वापरात नसलेल्या आणि किरकोळ स्वरूपाच्या वस्तू एकत्र करत त्या वितळवल्या जाणार आहेत. यामध्ये सुमारे १९ किलो ८२४ ग्रॅम २५६ मिली सोने व ४२५ किलो ८७७ ग्रॅम ६४४ मिली चांदीच्या चिजवस्तू आहेत. दान म्हणून आलेल्या अलंकारापैकी जे असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मीळ असतील, त्याचबरोबर जे अलंकार उत्सवाप्रसंगी ‘श्री’साठी वापरलेत जातात ते जतन करण्यात येणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले. तसेच सोने चांदीचे दागिने वितळवून त्याच्या विटा तयार करणे, विटा बँकेत ठेव स्वरूपात ठेवणे,त्यांची विक्री करणे, नवीन अलंकार तयार करणे यासाठी शासनाने परवानगी दिली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

हे वाचले का?  सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरण संवर्धनासाठी ‘सह्याद्री संकल्प’चे मदतीचे आवाहन

या अलंकाराची वाहतूक करण्यापूर्वी त्या वस्तुूचा वाहतूक विमा उतरविण्यात यावा. अलंकार व वस्तू बाहेर काढून इंडिया गव्हर्मेट मिंट, मुंबई रिफायनरीमध्ये पुन्हा वजन करणे, हे अलंकार व वस्तू वितळविण्याकरिता रिफायनरीच्या ताब्यात देण्यात यावेत, असे, विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कराळे यांनी सांगितले. दागिन्याचे वजन करताना राष्ट्रीयीकृत बँक आणि मंदिर समितीचा वजन काटा व सराफ यांच्याकडून वजन केले जाणार आहे. वजन करतेवेळी वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे सदस्य, शासनाचे अधिकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार असून, या प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे गुरव यांनी या वेळी सांगितले.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन